मुंबई : राज ठाकरे… फर्डा वक्ता. ज्यांचं भाषण सुरू झालं की श्रोता मंत्रमुग्ध होतो. त्यांच्या भाषणातील शब्द अन् शब्द आपल्या कानांनी टिपून घेतो. त्यांचे समर्थक असो वा विरोधक सगळेच त्यांचं भाषण लक्ष देवून ऐकतात. अन् भाषणानंतर पुढचे आठ दिवस त्यांच्या भाषणातील मुद्दे सामाजिक-राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. पण राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ज्यादिवशी सभा असते. तो दिवस’शिवतीर्थ’वरचा (Shivtirth) कसा असतो? भाषणाला उभं राहताना राज ठाकरे यांच्या मनात नेमके कोणते भाव असतात. त्यावरच त्यांनी आज भाष्य केलं. भाषण करण्याआधी माझ्या हाता-पायाला घाम सुटलेला असतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
राज ठाकरे यांनी आपण भाषणाला जाताना आपल्या मनाची अवस्था काय असते यावर भाष्य केलंय. “कुणाला विश्वास बसणार नाही, पण भाषण करण्याआधी माझ्या हाता-पायाला घाम सुटलेला असतो. माझे हात-पाय थंड पडलेले असतात. शंभर गोष्टी मनात असतील तरी मी काय बोलणार हे मलाच माहिती नसतं. कित्येकदा मी काही मुद्दे लिहून काढतो.माझ्या पुढे पोडियमला ते लावलेलेही असतात. पण माझं लक्षच जात नाही. मी सभास्थळी गेल्यावर व्यासपीठावर उभं राहेपर्यंत माझ्या हाताला घाम फुटलेला असतो. पण एकदा भाषणाला उभा राहिलो की मला कुणीही दिसत नाही, अगदी शर्मिला समोर असेल तरी माझं लक्ष जात नाही”, असं राज ठाकरे म्हणाले. उद्या राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होतेय. त्याआधी एबीपी माझावरच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
शर्मिला ठाकरे यांनी ‘शिवतीर्थ’वर कसं वातावरण असतं ते सांगितलं. त्या म्हणाल्या की, “ज्या दिवशी राज यांचं भाषण असतं त्या दिवशी त्यांच्या खोलीत आम्ही कुणालाही जावू देत नाही. कारण भाषणात काय बोलायचं याची ते तयारी करत असतात.”
राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी जमते. पण त्यांचं भाषण नेमकं फुलतं कसं? याबाबतही राज ठाकरे बोलते झाले. “एखाद्या मुद्द्यावर 25-30 गोष्टी मांडता येतील. तसे मुद्दे मनात तयारही असतात. पण भाषणावेळी माझ्या मनात काय येईल, हे माहित नसतं म्हणून त्याचं जास्त टेन्शन असतं. मी कधीही ठरवलेलं नसतं की या विषयावर असं बोलायचं किंवा या मुद्द्यानंतर तो मुद्दा, असं काहीही नसंत मी एकात एक गोष्टी गुंफत जातो, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांची नुकतीच गुढीपाडव्याला सभा झाली. जी प्रचंड गाजली. त्यांच्या या सभेतली भोंग्यांचा मुद्दा गाजतोय. त्यामुळे महाराष्ट्रचं सामाजिक राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अश्यातच उद्या त्यांची औरंगाबादमध्ये सभा होतेय. यात ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडणार असल्याचं बोललं जातंय. त्याच्या या सभेकडे सर्वांचं लक्ष आहे. अश्यातच त्यांनी भाषणाआधी त्यांची मनोवस्था काय असते त्यावर भाष्य केलं.