मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या निकालाचा (Maharashtra Rajya Sabha Election Results) सस्पेन्स गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पाहायला मिळाला. पण अखेर शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास निकाल लागला. अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या सहाव्या जागेवर भाजप उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) विजयी झाले. कोल्हापुरातील दोन गडी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. यात शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. शिवसेनेने (Shiv Sena) आपले दोन उमेदवार राज्यसभा निवडणुकीसाठी दिले होते. संजय राऊत आणि संजय पवार या दोघांना उमेदवारी देण्यात आली होती. महाविकास आघाडीला संजय पवार निवडून येतील, अशी खात्री वाटत होती. पण मतांची जुळवाजुळव करताना गणितं चुकली आणि संजय पवार पराभूत झाले. तर दुसरीकडे धनंजय मडाडिक यांनी दणदणीत विजय मिळवला आणि संजय राऊतांपेक्षाही जास्त मतं मिळवली. पण या सगळ्या निकालात आता चर्चा सुरु झाली आहे, ती शिवसेनेच्या पराभवाची.
शिवसेनेला हा पराभव टाळता आला असता का? शिवसेनेनं युवराज संभाजी छत्रपती यांना उमेदवारी द्यायला हवी होती का? निवडणुकीच्या रिंगणात जर संभाजी छत्रपती असते, तर निकालाचं चित्र वेगळं असतं का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर संभाजी छत्रपतींनी दिलेली प्रतिक्रियाही बोलकी होती.
कोल्हापुरच्या दोन पैलवानांची कुस्ती रंगतदार सुरू आहे.
मला आनंद आहे कोल्हापुरचाच खासदार होणार.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 10, 2022
गुरुवारी रात्री उशिरपर्यंत चाललेल्या मतमोजणीमुळे निवडणुकीच्या निकाला सस्पेन्स वाढलेला होता. यातच युवराज संभाजी छत्रपतींनी एक ट्वीट केलं होतं. हे ट्वीट अत्यंत बोलकं होतं. कोल्हापूरच्या दोन पैलवानांची कुस्ती रंगतदार सुरू आहे. मला आनंद आहे कोल्हापूरचाच खासदार होणार, असं ट्वीट त्यांनी केलं होतं. त्यांच्या ट्वीटच्या सहा तासांनी कोल्हापूरच्या जागेचा निकाल लागला. कोल्हापुरातील दोन पैलवानांपैकी एकानं बाजी मारली. त्याचं नाव होतं, भाजपचे धनंजय महाडिक.
I also congratulate Hon Union Minister @AshwiniVaishnaw ji, @BJP4Maharashtra President @ChDadaPatil & all my colleagues, MLAs and each & every Karyakarta for this success in #RajyaSabhaElection2022 #Maharashtra pic.twitter.com/7IKB4fzTwa
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 11, 2022
शिवसेना दोन जागी राज्यसभेची निवडणूक लढवणार हे तर स्पष्ट झालं होतं. पण दुसरी जागा कोण लढवणार यावरुन मोठं राजकारण तापलं होतं. दरम्यान, संभाजी छत्रपती यांना शिवसेना अपक्ष उमेदवार म्हणून घोषित करणार का, अशाही शक्यता वर्तवल्या जात होत्या. राजकीय घडामोडींना वेग आलेला होता. त्यांना उमेदवारी देण्यासाठीच्या हालचालीही सुरु झालेल्या. खुद्द संभाजी राजे छत्रपती यांनीच याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली होती.
संभाजी छत्रपतींनी शिवसेनेत यावं, आम्ही त्यांना निवडणुकीची उमेदवारी देऊ, अशी शिवसेनेची भूमिका होती. तर कोणत्याच राजकीय पक्षात जाणार नाही, या भूमिकेवर संभाजी छत्रपती ठाम होते. अनेक वाटाघाटी सुरु असताना शिवसेना आणि संभाजी छत्रपती यांच्यात अखेर उमेदवारीचा प्रश्न निकालीही निघाला होता. पण दरम्यान, अचानकच संजय पवार यांना कोल्हापुरातून उमेवारी देण्यात आल्याचं घोषित करण्यात आलं. हा माझ्यासाठी धक्का होता, असं संभाजी छत्रपतींनीही म्हटलं होतं. दरम्यान, याच वेळी संभाजी राजे यांनी राज्यसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं घोषित केलं. पण माघार नाही, हा तर स्वाभिमान आहे, असं म्हणत त्यांनी आपला निर्णय जाहीर केला होता.
आता झालेल्या पराभवानंतर छत्रपती संभाजींना उमेदवारी न देणं, ही चूक होती का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सहाव्या जागेच्या अटीतटीच्या लढतीत भाजपने शिवसेनेवर मात केली आहे. प्रतिष्ठेच्या बनलेल्या या जागी भाजपने विजय मिळल्यामुळे शिवसेनेच्या पराभवाची कारणं कोणती होती, यावरुन आता राजकीय वर्तुळांचा चर्चांना उधाण आलंय.
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी ‘छत्रपती संभाजी राजेंना उमेदवारी दिली असती, तर..?’ या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलंय, की, हा जर-तरचा मुद्दा आहे. जर त्यांना उमेदवारी दिली असती, तर कदाचित भाजपने आपला उमेदवारच उभा केला नसता. त्यामुळे कदाचित ही निवडणूक बिनविरोध झाली असती. पण सध्या समोर आलेल्या निकालानुसार अपक्ष आमदारांची मतं फुटली असल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीचं कोअर मॅनेजमेन्ट मतदान प्रक्रियेचा प्राधान्य क्रम राबवताना कमी पडली असण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा धनंजय महिडाकांना झाल्याचं दिसतंय.