सुप्रीम कोर्टात आज काय? शिवसेनेची ‘ही’ मागणी मान्य केली तर पुन्हा पुढची तारीख? ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम म्हणाले….
शिंदे गट विरोधात ठाकरे गटातील वादाची, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आजपासून सुरु होत आहे.
कृष्णा सोनरवाडकर, मुंबईः महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आजपासून महत्त्वाची सुनावणी पार पडत आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात अपात्रतेची प्रलंबित कारवाई, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी वैध आहे की नाही, राज्यपाल तसेच विधानसभा अध्यक्षांचे अधिकार अधोरेखित करणे आदी गुंतागुंतीच्या विषयांवर सविस्तर सुनावणीस काही वेळातच सुरुवात होईल. मात्र यापैकी नेमका कोणता विषय सुनावणीसाठी आधी घेतला जाईल, यावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी भाष्य केलंय. सध्या सत्तासंघर्षाची सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठासमोर केली जात आहे. ही सुनावणी पाच ऐवजी सात सदस्यीय घटनापीठासमोर व्हावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीवरच आधी सुनावणी घेतली जाईल. शिवसेनेची मागणी सुप्रीम कोर्टाकडून मान्य होते की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उज्ज्वल निकम काय म्हणाले?
टीव्ही ९ च्या प्रतिनिधींशी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले, ठाकरे गटाकडून ७ सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे. नाबाम रबियाचा निकाल ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिला होता. मात्र घटनेच्या १० व्या परिशिष्टाच्या मूळ नियमाच्या विसंगत आहे. फेरविचार करायचा असेल तर ७ न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन केलं पाहिजे, अशी मागणी शिवसेनेची आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत आधी याविषयी निर्णय घेतला जाईल.
… तर सुनावणीची पुढची तारीख!
शिवसेनेच्या या मागणीला शिंदे गटाने विरोध केला आहे. सुप्रीम कोर्टाने ही मागणी मान्य केली.. ७ न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन करण्यात आलं तर तारीख पुढे जाईल, अशी माहिती निकम यांनी दिली. तसेच सात सदस्यांच्या घटनापीठात कोणत्या न्यायाधीशांना नेमायचं, हा विषय येईल.तसेच सदर घटनापीठ स्थापन झालं तर कोणत्या विषयाला प्रायोरिटी द्यायची हे ठरवावं लागेल. त्यामुळे सुनावणीसाठी पुढची तारीख मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आजपासून महासुनावणी…
शिंदे गट विरोधात ठाकरे गटातील वादाची, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आजपासून सुरु होत आहे. कोर्टाच्या पटलावर सकाळी ०.३० वाजता ही सुनावणी सुनावणीसाठी घेतली जाईल.या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना केली आहे. त्यात सरन्यायाधीश वाय एस चंद्रचूड, न्या. शहा. न्या. मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. नरसिंहा यांचा समावेश आहे.
७ महिन्यांपूर्वी शिवसेनेत बंड होऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे-भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र हे सरकार अवैधरित्या स्थापन करण्यात आले आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरु केली आहे, मात्र या कारवाईचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. या आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही असल्याने सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर राज्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.