महाराष्ट्राचा मंत्री कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात
सीमा लढ्यात हुतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कर्नाटकात गेलेले महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे
बेळगाव : सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कर्नाटकात गेलेले महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे (Rajendra Patil-Yadravkar). बेळगावात संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी 17 जानेवारीला आयोजित केला जातो. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आज शुक्रवारी बेळगावला पोहोचले. मात्र, हुतात्मा चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात यड्रावकर यांना हुतात्म्यांना अभिवादन करण्यापासून कर्नाटक पोलिसांनी रोखले (Rajendra Patil-Yadravkar).
यावेळी यड्रावकर आणि कर्नाटक पोलिसांमध्ये शाब्दिक वादही झाला. यड्रावकर यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बेळगाव पोलिसांनी कुणाचंही ऐकून घेतलं नाही आणि थेट यड्रावकर यांना ताब्यात घेतलं. बेळगाव शहरातील हुतात्मा चौकात हा प्रकार घडला. या घटनेनंतर काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. या घटनेमुळे बेळगाव आणि सीमा भागात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी यड्रावकर हे गुरुवारी मध्यरात्रीच बेळगावात दाखल झाले होते. यड्रावकर हे कोणताही सरकारी फौजफाटा न घेता बेळगावला गेले होते. महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तींनी बेळगावात येऊ नये, यासाठी कर्नाटक पोलीस राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची तपासणी करीत होते. मात्र, यड्रावकर हे मध्यरात्रीच बेळगावात पोहोचले आणि ते हुतात्मा चौकात अभिवादन करण्यासही हजर झाले. मात्र, यावेळी पोलिसांनी त्यांना अभिवादन करण्यापासून रोखले आणि ताब्यात घेतलं.
कोण आहेत राजेंद्र पाटील-यड्रावकर?
राजेंद्र पाटील-यड्रावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभेतील अपक्ष आमदार आहेत. सध्या ते महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. महाराष्ट्र सरकारमधील सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य या विभागाचे राज्यमंत्रिपद राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. ते शिरोळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष सदस्य म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सदस्य आहेत. महाविकास आघाडीमध्ये यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.