भंडाऱ्याचा आढावा | भाजप आपल्या तीन जागा कशा राखणार?
भंडारा जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुके मिळून तुमसर, भंडारा आणि साकोली असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत.
भंडारा : भंडारा जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुके मिळून तुमसर, भंडारा आणि साकोली असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. या तीनही मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व आहे.
1) तुमसर विधानसभा (Tumsar Vishan sabha)
भाजपचे चरण वाघमारे हे तुमसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे चरण वाघमारे निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांचा पराभव केला. या मतदारसंघात तुमसर आणि मोहाडी तालुक्यांचा समावेश आहे. या विधानसभा क्षेत्राला धानाचे कोठार असे संबोधले जाते. अनेक मॅगनीजच्या खाणी आणि जंगले या क्षेत्रात असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा भाग संपन्न मानला जातो. तरीही बेरोजगारी हा या भागातील मुख्य प्रश्न आहे.
2) भंडारा विधानसभा (Bhandara Vidhan sabha)
भाजपचे रामचंद्र अवसारे हे भंडारा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2014 मध्ये रामचंद्र अवसरे यांनी बसपच्या देवांगना गाढवे यांचा पराभव केला. भंडारा विधानसभा क्षेत्रात भाजपसोबत राष्ट्रवादीलाही जनाधार आहे. परंतु दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन बसपनेही आपली ताकद दाखवली.
भंडारा हे जिल्ह्याचे ठिकाण असले आणि जिल्ह्यातील राजकारणाची सूत्रे जरी येथून चालत असली तरी उमेदवारी मात्र बाहेरुन ठरत असते. आशियातील सर्वात मोठे समजलं जाणारं गोसे धरण या मतदारसंघात आहे. मात्र तरीही सिंचन आणि पिण्याचे शुद्ध पाणी यासाठी येथील मतदार आणि शेतकरी संघर्ष करतात. या धरणाच्या भूमिपूजनाला जवळपास 27 वर्ष पूर्ण होत आहेत, मात्र या धरणाचं काम पूर्ण झालं नाही. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी इथली परिस्थिती आहे.
3) साकोली विधानसभा (Sakoli Vidhan sabha)
भाजपचे राजेश उर्फ बाळा काशीवर हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसच्या सेवक वाघाये यांचा पराभव केला होता. साकोली विधानसभा मतदारसंघात साकोली, लाखनी आणि लाखांदूर या तीन तालुक्यांचा समावेश आहे.
या तिन्ही क्षेत्रात जंगले असल्यामुळे आणि उद्योग नसल्यामुळे विकासाच्या बाबतीत हे क्षेत्र मागे पडलेले आहे. शेती हा या भागातील लोकांचा मुख्य उद्योग आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर येथील राजकारण निगडित आहे. येथील आमदाराला करण्यासारखं जास्त नसलं तरी रस्ते, वाहतूक, सिंचन, बेरोजगारी, यासारखे महत्वाचे प्रश्न सोडवता आले नाहीत. या क्षेत्र कोहली समाजाचे प्राबल्य असून निवडणुकीचा कल यांच्या मतदानावर अवलंबून असतो. या खालोखाल बौद्ध समाजाचे आणि कुणबी समाजाचेही वर्चस्व इथे जाणवते.
लाखांदूर तालुका हा काँग्रेस नेते नाना पटोले यांचा प्रभाव असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. साकोली विधानसभा मतदारसंघ हे भाजप समर्थित क्षेत्र आहे. येथून नेहमी भाजपचे उमेदवार निवडून येतात. मात्र नाना पटोले यांच्या प्रभाव या भागात असल्यामुळे आणि नाना पटोले हे सध्या काँग्रेस मध्ये असल्यामुळे यंदा काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
भंडारा जिल्हा – 03 (Bhandara MLA list)
60 – तुमसर – चरण वाघमारे (भाजप)
61 – भंडारा – रामचंद्र अवसारे (भाजप)
62 – साकोली – बाळा काशिवार (भाजप)