औरंगाबाद: मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेतील मतभेद कमालीचे वाढून ही निवडणूकपूर्व युती जवळपास संपल्यात जमा आहे. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेसाठी नवी समीकरणं (MahaSenaAghadi Pattern in Maharashtra) तयार होत आहेत. विधानसभा निवडणुकीत ज्या नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवून जिंकली, आता तेच राज्याच्या राजकारणात महासेनाआघाडीच्या निमित्ताने (MahaSenaAghadi Pattern in Maharashtra) सोबत येत आहेत. शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोठे नेते सहजपणे एकमेकांसोबत वावरताना दिसत आहेत. त्यांच्याकडून स्थानिक नेत्यांनाही जुळवून घेण्यास सांगण्यात आलं. मात्र, स्थानिक नेते जुने वैर सोडून जुळवून घेतील का हा प्रश्नच आहे.
राज्यात होऊ पाहणारा महासेनाआघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यास औरंगाबादच्या राजकारणावर याचा मोठा परिणाम होणार आहे, असं मत राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत. आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका असून औरंगाबादच्या राजकारणात या निवडणुकीचं मोठं महत्व आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली या तिन्ही जिल्हा परिषदांमध्ये भाजपला बाजूला सारून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्र येताना दिसत आहे. त्यामुळे याचे परिणामही पाहायला मिळणार आहेत. या पॅटर्नचा परिणाम जिल्हा परिषदेच्या राजकारणावर होणार नसला, तरी महानगरपालिकेच्या राजकारणात होईल, असा अंदाज राजकीय अभ्यासक प्रमोद माने यांनी व्यक्त केला.
‘शिवसेनेचा स्वभाव काँग्रेस राष्ट्रवादीला कधीच पचणार नाही’
प्रमोद माने म्हणाले, “नगरपालिका, पंचायत समित्या नगरपंचायतीत शिवसेना-भाजप युती नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना चांगल्या प्रकारे नांदून सुखाने संसार करत असल्याचं जाणकार बोलत आहेत. शिवसेनेचा स्वभाव काँग्रेस राष्ट्रवादीला कधीच पचणार नसल्याचं म्हणत त्यांच्यात वाद होतील, असंही मत काहीजण व्यक्त करत आहेत. पटलं तर औरंगाबाद, हिंगोली आणि जालन्याप्रमाणे चांगला संसार होईन, नाही तर पुन्हा दुफळी निर्माण होईन.”
‘दोन्हीकडे सत्ता कायम राहील’
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी यावर बोलताना राज्याच्या राजकीय समीकरणांचा स्थानिक पातळीवर परिणाम होतोच, असं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “जिल्हा परिषद आणि महापालिकेत शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे. स्थानिक राजकारणात याचा परिणाम झाला तरी दोन्हीकडे सत्ता कायम राहील. गरजेप्रमाणे राजकीय नेते वागत असतात. त्याच पद्धतीने आम्ही वागू आणि निश्चितपणे चांगले काम करु.”
‘महाराष्ट्राला नवीन दिशा देण्याचे काम महाशिवआघाडी करेल’
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार म्हणाले, “महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं सरकार स्थापन होणार असल्याने ही चांगली बाब आहे. महाराष्ट्राला नवीन दिशा देण्याचे काम महाशिवआघाडी करेल. या आघाडीचा स्थानिक राजकारणावर कुठलाही परिणाम होणार नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित येऊन महाराष्ट्राच्या जनतेला नवी दिशा द्यावी, अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे.”
मराठवाड्यातील 3 जिल्हा परिषदांच्या राजकारणात भाजपला बाजूला सारून राबवलेला महासेनाआघाडीचा पॅटर्न आता राज्यातही येत आहे. यामुळे मराठवाड्यात सुखाने संसार सुरु असला, तरी राज्याच्या राजकारणात याला किती यश मिळेल हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.