Sanjay Raut : ‘हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नातील सरकार’, संजय राऊतांचा मोठा दावा; शरद पवार काय म्हणाले?
'आता जे सरकार स्थापन झालं आहे ते एकेकाळी बाळासाहेबांचं स्वप्न होतं, बाळासाहेबांची भूमिका होती. आता जे कुणी गैरसमज निर्माण करत आहेत, त्यांना शिवसेनेचा विचार आणि बाळासाहेबांची भूमिका माहिती नाही'.
मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये जोरदार टीका आणि आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर हे सरकार बनलं नसतं. बाळासाहेबांनी अशा खुर्चीला लाथ घातली असती, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जातो. त्याबाबत आज पुण्यात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रश्न विचारला असता राऊतांनी मोठा दावा केलाय. हे सरकार बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार आहे. ही बाळासाहेबांचीच भूमिका होती, असा प्रतिदावा संजय राऊत यांनी केलाय. पुण्यात आज शरद पवार (Sharad Pawar) आणि संजय राऊत यांची एकाच व्यासपीठावर मुलाखत पार पडली. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
‘एकेकाळी बाळासाहेबांचं स्वप्न होतं, बाळासाहेबांची भूमिका होती’
संजय राऊत यांनी प्रश्न विचारण्यात आला की बाळासाहेब ठाकरे यांना हे सरकार मान्य नसतं असा दावा भाजपकडून केला जातो. त्यावर राऊथ म्हणाले की, ‘अजिबात नाही… अनेकदा पवारसाहेब आणि बाळासाहेबांनी व्यासपीठ शेअर केलं आहे. इतकंच नाही तर बाळासाहेबांनी जाहीरपणे सांगितलंय की ही ताकद आणि आपली ताकद एकत्र आली तर आपण दिल्लीला झुकवू. त्यामुळे आता जे सरकार स्थापन झालं आहे ते एकेकाळी बाळासाहेबांचं स्वप्न होतं, बाळासाहेबांची भूमिका होती. आता जे कुणी गैरसमज निर्माण करत आहेत, त्यांना शिवसेनेचा विचार आणि बाळासाहेबांची भूमिका माहिती नाही. त्यांनी अभ्यास केला पाहिजे, मी त्यांची शिकवणी घ्यायला तयार आहे. यापूर्वीही असे प्रयत्न झाले आहेत. भाजपचे आभार मानायला हवेत की महाराष्ट्राच्या मनातील सरकार आणायला त्यांनी आम्हाला उत्तेजन दिलं’, असा टोलाही त्यांनी लगावलाय.
…आणि राजकीय क्रायसिसवर उत्तर सापडतं – पवार
शरद पवार यांनाही आताचं महाविकास आघाडी सरकार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत विचारलं असता, ‘जेव्हा क्रायसिस असतो आणि विशेषत: राजकीय क्रायसिस तयार होतो, त्यावेळेला बाळासाहेब असते तर त्यांनी काय केलं असतं, हा विचार डोक्यात येतो आणि जो क्रायसिस आहे त्याचं उत्तर सापडतं’, असं शरद पवार म्हणाले.