Mahavikas Aghadi : सरकारमधून बाहेर पडण्याच्या राऊतांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीची स्पष्ट नाराजी, भुजबळ म्हणतात, आधी सांगायला हवं
संजय राऊतांच्या नेमक्या याच भूमिकेमुळे आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेनं हे वक्तव्य करण्यापूर्वी एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करायला हवी होती, अशा शब्दात स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे यांची बंडाळी महाविकास आघाडी सरकारसाठी मोठं संकट घेऊन आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत 45 आमदार असल्याचं आता स्पष्ट झालंय. तसंच ही संख्या वाढण्याचीही शक्यता आहे. अशावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केलं. एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावावर विचार होईल, शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल, मात्र आमदारांनी 24 तासांच्या आज मुंबईत यावं असं आवाहन त्यांनी केलंय. संजय राऊतांच्या नेमक्या याच भूमिकेमुळे आता महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटकपक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेनं हे वक्तव्य करण्यापूर्वी एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करायला हवी होती, अशा शब्दात स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.
त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन बोलायला हवं – भुजबळ
छगन भुजबळ म्हणाले की, मला असं वाटतं त्यांनी असं विधान करण्यापूर्वी महाविकास आघाडीतील आमच्या पक्षाचे जे नेते आहेत, त्यांच्याशी आधी चर्चा करायला हवी होती. त्यांनी विश्वासात घेऊन बोलायला हवं, त्यांच्या काय अडचणी आहेत ते सांगायला हवं होतं. अर्थात शिवसेना स्वतंत्र पक्ष आहे. त्यांच्या निर्णय घेण्यास ते स्वतंत्र आहेत. मी ही चॅनलवर ऐकली की ते म्हणाले तुम्ही या, आम्ही सरकारमधून बाहेर पडतो. आता कुठल्याही पक्षाला सरकारमध्ये राहायची की नाही हे ते ठरवू शकतात. पण त्यांनी सांगणं अपेक्षित आहे. उद्या सरकार अडचणीत आलं आणि पडलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजिबात काळजी करत नाही. विरोधी पक्षात बसून जनतेची सेवा करण्याची सवय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्याप्रकारे आहे. त्यामुळे आमच्यासाठी ते नवीन नाही. सत्ता येते, सत्ता जाते आमची विरोधी पक्षात बसण्याचीही तयारी आहे. पण एकदा त्यांनी आमचे नेते शरद पवार, अजितदादा, जयंत पाटील यांना सांगावं आणि एकदाचा यातील संभ्रम दूर करावा.
‘राष्ट्रवादीच्या आमदारांची भाजपसोबत जाण्याची मागणी नाही’
मी शिवसेनेबाबत काहीही बोलणार नाही. कारण ते आमचे आतापर्यंत तरी सहयोगी पक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं योग्य ठरणार नाही. भाजपसोबत जाण्याची कुठलीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची नाही. पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमदार, खासदार मजबूतपणे उभे आहोत, असा दावाही छगन भुजबळ यांनी केलाय.
संजय राऊतांचं नेमकं वक्तव्य काय?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना तुमच्या प्रस्तावावर विचार होईल, पण 24 तासांत मुंबईत या, असं आवाहन त्यांनी केलंय. संजय राऊत म्हणाले की, आमदारांनी आधी महाराष्ट्रात यावं. मुंबईत यावं. अधिकृतपणे मागणी करावी. त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल. पण आमदारांनी आधी मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी. तिथं बसून तुम्ही पत्रव्यवहार करू नका. आपण पक्के शिवसैनिक आहात. शिवसेना सोडणार नाह, असं सांगताय. सध्याच्या सरकारविषयी तुमची भूमिका असेल तर त्या सरकारमधून महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. 24 तासात परत या, हे मी जबाबदारीनं परत सांगतोय. मी हवेत मी भूमिका मांडत नाहीये. उद्धव साहेबांसमोर बसू आणि तुमची भूमिका स्वीकारण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं राऊत आवाहन राऊत यांनी केलंय.