मैं यहा हूँ, यहा हूँ, यहा हूँ : छगन भुजबळ
मैं यहा हूँ, यहा हूँ, यहा हूँ, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली.
मुंबई : मैं यहा हूँ, यहा हूँ, यहा हूँ, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे संवाद यात्रेनिमित्त नाशिकमध्ये आहेत. मात्र भुजबळ (Chhagan Bhujbal) मुंबईत असल्याने त्यांना त्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर भुजबळांनी माझी सून, मुलगा समीर, पंकज भुजबळ हे सर्व सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात आहेत असं सांगत, पक्ष सोडण्याच्या चर्चा फेटाळल्या.
छगन भुजबळ हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहेत. आठ दिवसांपूर्वी छगन भुजबळ आपल्या पूर्वनियोजित येवला मतदारसंघातील दौरा घाईत उरकून मुंबईला रवाना झाले होते. त्यावेळी तर त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता.
वाचा : पुढच्या काही दिवसात राष्ट्रवादीला न पचवता येणारे पाच धक्के
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडलं आहे. राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार वैभव पिचड, मधुकरराव पिचड, आमदार दिलीप सोपल, आमदार संदीप नाईक, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील हे दिग्गज पक्ष सोडून शिवसेना भाजपमध्ये गेले आहेत. तर रामराजे निंबाळकर, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक, भास्कर जाधव आणि पवारांचे नातेवाईक पद्मसिंह पाटील हे राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे.
सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
ज्येष्ठ नेते छगन भुजबळही (Chhagan Bhujbal) शिवसेनेच्या (Shivsena) वाटेवर असल्याच्या चर्चा असताना, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आजपर्यंत वडिलांची साथ दिल्याबद्दल त्या प्रत्येकाविषयी आदर कायम राहील’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आपल्या पक्षातून अनेक नेते बाहेर पडत आहेत. छगन भुजबळही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, यावरुन सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी नाशिकमध्ये प्रश्न विचारला. ‘कोणताही नेता पक्ष सोडून जात आहे, त्याचं दुःख वाटतंच. कारण आम्ही खासदार किंवा संघटना म्हणून काम करत नाही, तर एक कुटुंब म्हणून एकत्र असतो.’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
संबंधित बातम्या
Dhananjay Mahadik | राष्ट्रवादीला धक्के सुरुच, धनंजय महाडिक तिसऱ्या पक्षात प्रवेश करणार?
योग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची ‘गुपचिळी’