भाजप नेते अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश, शिवबंधन बांधताच भाजपवर तुफान हल्लाबोल
मुंबईत आज शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत अद्वय हिरे यांचा जाहीरपणे पक्षप्रवेश करण्यात आला.
मुंबईः मालेगावचे (Malegaon)भाजप नेते अद्वय हिरे (Advay Hire) यांचा आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात हिरे कुटुंबाला राजकारणात मोठं वलय आहे. माजी महसूल मंत्री सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब हिरे यांचे ते पणतू आहेत. तर माजी परिवहन राज्यमंत्री प्रशांत हिरे यांचे ते पुत्र आहेत. मालेगावचे शिंदे गटाचे नेते व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासमोर तगडा नेता देण्यासाठी शिवसेनेने ही मोठी खेळी केल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईत आज शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत अद्वय हिरे यांचा जाहीरपणे पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती. शिवसेनेत प्रवेश करताच अद्वय हिरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांच्या हाती शिवबंधन बांधले. त्यानंतर भगवी शाल त्यांच्या गळ्यात घालत त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं. तत्पुर्वी संजय राऊत यांनी अद्वय हिरे यांच्या पक्ष प्रवेशावर प्रतिक्रिया दिली.
‘संकटात साथ देताय हे महत्त्वाचं- संजय राऊत’
अद्वय हिरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेना आणखी दोन पावलं पुढे चालेल. हिरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे पक्षाला फायदा होईल. शिवसेना संकटात असताना आपण पक्षात प्रवेश केलात, याला जास्त महत्त्व असल्याचं संजय राऊत म्हणाले. आजच्या संकटात शिवसेनेचा तुम्ही हात पकडलाय, तो तुम्ही पकडा आणि आम्ही सोडणार नाहीत, असं करत वक्तव्य संजय राऊत यांनी अद्वय हिरे यांचं स्वागत केलं..
अद्वय हिरे यांचा भाजपवर हल्लाबोल
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अद्वय हिरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 2009 साली स्व. गोपीनाथ मुंडे यांनी मला भाजपात लोकसभेत निवडून देण्याची विनंती केली. तेव्हापासून मी भाजपात काम करतोय.. भाजपात मी गेलो तेव्हा भाजपला सगळे सोडून जाण्याच्या तयारीत होते. तेव्हा राजकारणात सोनिया गांधी यांना पंतप्रधान करण्याची लाट होती. अशा परिस्थितीत अमृतभाई पटेल यांना पाडून आम्ही भाजपा भक्कम केल्याची आठवण अद्वय हिरे यांनी सांगितली…
५० लोक भाजपच्या मांडीवर…
आम्ही असंख्य लोकांना भाजपात चांगल्या पदावर बसवलं. पण ५० लोक भाजपच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळे पक्षाला काय झालंय, हेच कळत नाही.. पक्षाला आमची गरज राहिली नाही, अशी खंत अद्वय हिरे यांनी व्यक्त केली.
‘… म्हणून भाजपचा त्याग केला’
अद्वय हिरे यांनी भाजपचं नेतृत्व का झुगारून दिलं, याचं कारण सांगितलं. ते म्हणाले, ‘ व्यक्तिगत पदासाठी मी भाजपकडे मागणी केलेली नाही..माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यावेळी जनआंदोलनात मी रस्त्यावर उतरलो. पक्षाकडे न्याय मागितला पण पक्षानं शेतकऱ्याला मरू दिलं… जो शेतकऱ्याला वाचवू शकत नाही, त्याच्या नेतृत्वात मी काम करणार नाही, म्हणून मी भाजपाचा त्याग केला.
कालपासून प्रदेशाध्यक्षांपासून भाजपचे फोन…
मी ठाकरे गटात प्रवेश करणार म्हटल्यावर कालपासून मला असंख्य भाजप नेत्यांचे फोन सुरु झाले, असं वक्तव्य अद्वय हिरे यांनी पक्ष प्रवेशावेळी केलं. ते म्हणाले, प्रदेशाध्यक्षांपासून असंख्य लोकांनी फोन केले. पण मी म्हटलं… कितीही खोके दिले तरी पैशासाठी आणि सत्तेसाठी बाप बदलणारी माझी औलाद नाही. मीच नाही तर संबंध उत्तर महाराष्ट्र शिवसेना कशी उभी राहिल, यासाठी आम्ही निश्चितपणे काम करू.. येत्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे यांना बसवल्याशिवाय हा कार्यकर्ता थांबणार नाही, असं आश्वासन अद्वय हिरे यांनी यावेळी दिलं.