आगामी विस्तारात माळी समाजाला मंत्रीपद देणार : पंकजा मुंडे
बीड : राज्य सरकारच्या आगामी मंत्रीमंडळ विस्तारात माळी समाजाला निश्चितपणे मंत्रीपद देण्याची हमी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. शिवाय महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याची ग्वाही देखील पंकजांनी दिली. बीड येथे आयोजित सावता परिषदेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. संत सावता […]
बीड : राज्य सरकारच्या आगामी मंत्रीमंडळ विस्तारात माळी समाजाला निश्चितपणे मंत्रीपद देण्याची हमी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. शिवाय महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याची ग्वाही देखील पंकजांनी दिली.
बीड येथे आयोजित सावता परिषदेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. संत सावता यांचे अरण हे तीर्थक्षेत्र असो की इतर मागण्या या सरकारने त्या पूर्ण केल्या आहेत. माळी समाजात मोठमोठे नेते, मंत्री झाले मात्र कोणीही समाजाचा विचार केला नाही. मात्र आम्ही येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात माळी समाजाला निश्चितपणे प्राधान्य देऊ, असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे या दोघी बहिणींचा कांदा, मुळा आणि भाजी देऊन सत्कार करण्यात आला.
“माळी समाजाने या सरकारच्या पाठीशी आपली ताकद उभी केल्याची जाणीव मला आहे. त्यामुळेच आगामी काळात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात माळी समाजाला निश्चितपणे मंत्रिपद दिले जाईल,” असे आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी मागच्या काही दिवसांपासून जोर धरत आहे. पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचं सांगितलं. यावेळी बोलताना माझे पंतप्रधान हे गरीब आईच्या पोटी जन्माला आलेत, ते कोणा प्रधानमंत्र्यांच्या पोटी जन्माला आलेले नाहीत, त्यामुळे मला विश्वास आहे, असंही त्या म्हणाल्या.