मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेमुळे काँग्रेसला होणार हे तीन मोठे फायदे, 2024 च्या निवडणुकीसाठी काय असेल रणनीती?
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेमुळे काँग्रेसला नेमका काय फायदा होणार आहे. निवडणुकीच्या दृष्टीने खर्गे यांचे अध्यक्ष पद का महत्त्वाचे आहे?
नवी दिल्ली, मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आज काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल तसेच पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत खर्गे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील (New President of Congress Party). या कार्यक्रमाला सुरवात झालेली आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी खर्गे यांनी यांनी बुधवारी सकाळी राज घाट, शांती वन, विजय घाट, शक्तीस्थळ, वीर भूमी आणि समता स्थळाला भेट दिली. राजघाटावर पोहोचल्यानंतर त्यांनी महात्मा गांधींच्या समाधीवर पुष्प अर्पण केले. यापूर्वी त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची मंगळवारी सायंकाळी 6 वाजता त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.
24 वर्षांनंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मिळाले आहेत. याआधी सीताराम केसरी हे बिगर गांधी अध्यक्ष होते. काँग्रेसच्या 137 वर्षांच्या इतिहासात 6 व्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांनी अध्यक्ष पदासाठी दावा केला होता. या निवडणुकीत खर्गे यांनी शशी थरूर यांचा 6225 मतांनी पराभव केला. खरगे यांना 7897 मते मिळाली. त्याचवेळी शशी थरूर यांच्या यांना 1072 मते मिळाली.
खर्गे अध्यक्ष झाल्याने काँग्रेसला याचा काय फायदा होणार
दलित व्होट बँक वळविण्यासाठी मदत मिळेल
काँग्रेसच्या राजकारणात काही काळापासून दलित व्होट बँकेवर विशेष भर दिला जात आहे. पंजाब निवडणुकीपूर्वी चरणजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवणारी पैज विसरलेली नाही. काँग्रेसला निवडणुकीत याचा काही फायदा झाला नाही, पण चरणजीत सिंग चन्नी – ‘पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री’ असा टॅग नक्कीच जोडला गेला. आता मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष बनल्याने पक्षाच्या दलित राजकारणालाही नवी धार येऊ शकते.
परिवारवादाच्या आरोपातून मुक्ती मिळेल
काँग्रेस परिवारवादाचे राजकारण करते, असा आरोप विरोधकांकडून वारंवार होत होता. या आरोपामुळे पक्षाचे अनेक निवडणुकांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. असं असलं तरी अनेक वर्षांनंतर पक्षाला गांधीविरहित अध्यक्ष मिळाल्याने खर्गे यांच्या विजयाचा सोशल मीडियावर प्रचारही केला जात आहे. आता हा संदेश जितक्या वेगाने लोकांमध्ये जाईल तितक्या वेगाने पक्षाबाबत सुरू असलेल्या एका मोठ्या आरोपातून मुक्ती होईल.
कर्नाटक निवडणुकीची तयारी
पुढील वर्षी कर्नाटकात विधानसभा निवडणुका होणार आहेत. येथे भाजप अंतर्गत कलहाचा सामना करत आहे. याशिवाय राज्याचे जातीय समीकरण असे आहे की, मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष झाल्यामुळे याचा काँग्रेसला फायदा होऊ शकतो. कर्नाटकात दलित लोकसंख्येच्या 19.5 टक्के आहेत, तर मुस्लिम 16 टक्के आहेत. अनुसूचित जमातींचा आकडाही 6.95 टक्के इतका आहे. काँग्रेसकडे मुस्लिम वोट बँक आधीपासूनच मोठी आहे. आता खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली दलित वोट बँक देखील वळविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
खर्गे यांच्यासमोर आहेत मोठी आव्हाने
मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष बनल्याने त्यांच्यासोबत अनेक आव्हानेही उभी राहिली आहेत. खरे तर हिमाचल प्रदेश आणि गुजरातसारख्या देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असताना त्यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. काँग्रेस अनेक गटात विभागली गेली आहे. एवढेच नाही तर अनेक राज्यात काँग्रेसचे अंतर्गत वादही आहेत. राजस्थानचे राजकीय संकट हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसने आपला जनाधार गमावला आहे, अशा स्थितीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना आपला जनाधार पुन्हा मिळवावा लागणार असून काँग्रेसला एकत्र आणण्याचे आव्हान खर्गे यांच्या समोर आहे.
कर्नाटकातील दलित नेते आहेत खर्गे
मल्लिकार्जुन खर्गे हे दलित नेते आहेत. ते कर्नाटकचे रहिवासी आहेत. याशिवाय ते कर्नाटकचे माजी प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. खर्गे हे आठ वेळा आमदार, दोन वेळा लोकसभा आणि एकदा राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यूपीए सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्रीही राहिले आहेत. मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेस अध्यक्षपदी पोहोचणारे तिसरे दलित नेते आहेत.