ईव्हीएमविरोधी आंदोलनात ममता बॅनर्जींचीही राज ठाकरेंना साथ
भेटीनंतर राज ठाकरे म्हणाले, "आम्ही मतपेटीवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहोत. बर्याच काळापासून आम्ही ही मागणी उपस्थित करीत आहोत. जेव्हा बहुतेक देशांनी ईव्हीएम बंद केली आहे, तेव्हा आपण अद्याप त्याचा वापर का करीत आहोत?" असा सवालही राज ठाकरेंनी केला.
कोलकाता : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन म्हणजेच ईव्हीएमविरोधात देशव्यापी मोर्चा उघडलाय. याचाच भाग म्हणून त्यांनी (Raj Thackeray) कोलकात्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आणि या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलंय. ममता बॅनर्जींनीही राज ठाकरेंना सोबत राहण्याचं आश्वासन दिलंय.
भेटीनंतर राज ठाकरे म्हणाले, “आम्ही मतपेटीवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहोत. बर्याच काळापासून आम्ही ही मागणी उपस्थित करीत आहोत. जेव्हा बहुतेक देशांनी ईव्हीएम बंद केली आहे, तेव्हा आपण अद्याप त्याचा वापर का करीत आहोत?” असा सवालही राज ठाकरेंनी केला.
मी इतर पक्षांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन एकत्रित पद्धतीने मतपत्रिकेवर निवडणुकांची मागणी वाढवावी. टीएमसी या विषयावर आमच्यासोबत आहे. 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात लोकशाही वाचवण्याचा कार्यक्रम होणार आहे. ममता बॅनर्जी यांनाही मी आमंत्रण दिले आहे, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.
दरम्यान, ईव्हीएमविरोधात कोर्टात जाणार का, या प्रश्नावर आपल्याला कोर्टावर विश्वास नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. मला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात विश्वास नाही, असं उत्तर त्यांनी दिलं.