मंगलप्रभात लोढांना धक्का, मुंबई भाजप प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्याची चिन्हं
भाजप मुंबई प्रदेशाध्यक्षपदासाठी आशिष शेलार यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे.
मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची वर्णी लागल्यानंतर मुंबई प्रदेशाध्यक्षपदीही नव्या नियुक्तीची चिन्हं आहेत. मुंबई भाजप प्रदेशाध्यक्षपदावरुन आमदार मंगलप्रभात लोढा यांची गच्छंती (BJP Mumbai President) होण्याचे संकेत मिळत आहेत.
भाजप मुंबई प्रदेशाध्यक्षपदासाठी आशिष शेलार यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे. मंगलप्रभात लोढांना हटवण्याची मागणी पक्षातून होत असल्यामुळे अध्यक्षपदी खांदेपालट होण्याची शक्यता आहे.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी सहा वाजता प्रदेश कार्यालयात मुंबईतील आमदार, नगरसेवकांना पाचारण करण्यात आलं आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे.
या बैठकीत ‘मुंबई भाजप’ला नवे प्रदेशाध्यक्ष मिळू शकतात. मुंबई अध्यक्षपदासाठी आशिष शेलारांसोबत अतुल भातखळकर, पराग आळवणी यांचीही नावं चर्चेत आहेत.
मंगलप्रभात लोढा हे देशातील सर्वांत श्रीमंत बांधकाम व्यावसायिक आहेत. 64 वर्षीय लोढा हे मलबार हिल मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आमदारपदी निवडून आले आहेत. गेली अनेक वर्ष मलबार हिलवर लोढा यांनी भाजपचं वर्चस्व राखलं आहे.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर, जुलै 2019 मध्ये मंगलप्रभात लोढा यांच्याकडे भाजप मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती. आशिष शेलारांना मंत्रिपद दिल्यानंतर शेलारांकडील जबाबदारी त्यावेळी लोढांकडे सोपवण्यात आली होती. परंतु निवडणुकीत भाजपला धक्का बसल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच लोढांना हलवण्याच्या हालचाली (BJP Mumbai President) दिसत आहेत.