भाजप नेते माणिकराव कोकाटेंचा नाशिकमधून बंडखोरीचा इशारा
नाशिक : लोकसभा निवडणुकांपूर्वी नाशिकमध्ये शिवसेना-भाजप युतीचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवाराला निवडून आणण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. मात्र भाजपचे नेते माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्या नावाचा विचार करावा, अन्यथा कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढवावी लागेल, असा सूचक इशारा दिला. त्यामुळे उमेदवार घोषित झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेसाठी बंडखोरांना […]
नाशिक : लोकसभा निवडणुकांपूर्वी नाशिकमध्ये शिवसेना-भाजप युतीचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवाराला निवडून आणण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. मात्र भाजपचे नेते माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्या नावाचा विचार करावा, अन्यथा कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढवावी लागेल, असा सूचक इशारा दिला. त्यामुळे उमेदवार घोषित झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेसाठी बंडखोरांना थोपवण्याचं आव्हान असणार आहे.
शिवसेना आणि भाजपच्या काल झालेल्या मेळाव्यात दोन्ही नेत्यांनी एकदिलाने दिलेल्या उमेदवाराच्या विजयासाठी काम करा असा सल्ला आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला. युती झाल्यानंतर अनेक इच्छुकांना तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट झाल्याने ते नाराज झाले. माणिकराव कोकाटे गेल्या काही महिन्यांपासून गुडघ्याला बाशिंग लावून होते. तिकीट मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बंडखोरीची भाषा सुरू केली. त्यांचा रोख लक्षात आल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची समजूत काढून त्यांना निवडणूक लढवू देणार नाही असं देखील म्हटलं होतं.
दुसरीकडे माणिकराव कोकाटे अजूनही शांत व्हायला तयार नाहीत. युतीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची वाट बघतो आहे असं सूचक विधान करून कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवणारच असा निर्धार व्यक्त केला आहे.
माणिकराव कोकाटे यांच्याकडे सिन्नर आणि इतर भागातली कार्यकर्त्यांची टीम तयार आहे. मराठा मोर्चाच्या निमित्ताने कोकाटे यांना पाठिंबा देणारा समाज देखील मोठा आहे. अशा परिस्थितीत कोकाटे यांनी निवडणूक लढवली तर त्याचा फटका युतीच्या उमेदवाराला बसेल हे निश्चित आहे. त्यामुळेच सरकारचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन कोकाटे यांच्या नाराजीवर काय तोडगा काढतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.