Congress : मनिष तिवारीही काँग्रेसला झटका देण्याच्या तयारीत? मोदींच्या अग्निवीर योजनेची तोंडभरुन स्तुती
काँग्रेसचे खासदार मनिष तिवारी यांनी अग्निपथ (Agneepath) योजनेचे कौतुक केले आहे. त्यांनी या योजनेबाबत एक लेख देखील लिहीला आहे. मात्र ही तिवारी यांची ही व्यक्तीगत भूमिका असल्याचे काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : मोदींच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अग्निपथ (Agneepath) योजनेची घोषणा केली. मात्र या योजनेत करण्यात आलेल्या तरतुदीवरून काँग्रेससह (Congress) विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर अनेक सवाल उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या योजनेवर सडकून टीका केली. मात्र काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी या योजनेचे समर्थन केले आहे. त्यांनी या योजनेच्या समर्थनार्थ एक लेख देखील लिहिला आहे. मात्र आता काँग्रेसमधील काही नेत्यांनी त्यांच्या या लेखावर अक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे संपर्क प्रमुख जयराम रमेश यांनी या लेखाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, मनिष तिवारी यांनी जो लेख लिहिला आहे, ती त्यांची व्यक्तीगत भूमिका आहे. त्याच्याशी पक्षाचा काहीही संबंध नाही. अग्निपथ या योजनेबाबत काँग्रेसची भूमिका वेगळी असल्याचे ट्विट त्यांनी केले होते. या ट्विटला रिट्विट करत मनिष तिवारी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
तिवारींनी नेमके काय म्हटले?
देशाला बलशाली बनवायचे असेल तर अग्निपथ सारख्या काही योजनांची गरज असल्याचे मनिष तिवारी यांनी म्हटले होते. तसेच यामाध्यमातून तरुणांना रोजगार देखील मिळणार असल्याचे आपल्या लेखात तिवारी यांनी म्हटले होते. मनिष तिवारी यांच्या या लेखावर काँग्रेसमधील काही नेत्यांकडून जोरदार अक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर जयराम रमेश यांनी तिवारी यांच्या त्या लेखाशी काँग्रेसचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता मनिष तिवारी यांनी देखील ट्विट करत जयराम रमेश यांना प्रत्युत्तर दिले आहे. मी सुद्धा तेच म्हटलो होतो की, हे माझे व्यक्तीगत मत आहे, मात्र जयराम रमेश यांनी तो पूर्ण लेख वाचायला हवा होता. तो न वाचताच त्यांनी आपली भूमिका जाहीर केल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.
काय आहे अग्निपथ योजना
ज्या तरुणांना सौन्यदलात भरती व्हायचे आहे, त्यांच्यासाठी ही योजना केंद्र सरकारने तयार केली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्ष भारतीय सैन्य दलात संधी देण्यात येणार आहे. या काळात त्यांना तीस ते चाळीस हजार एवढा पगार असणार आहे. निवृत्त होताना त्यांना अकरा लाखांच्या आसपास रक्कम देखील मिळणार आहे. मात्र या योजनेला अनेक राज्यातील तरुणांकडून विरोध होत आहे. चार वर्षानंतर आम्ही काय करावे असा प्रश्न या तरुणांनी उपस्थित केला आहे. अग्निपथला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणांकडून अनेक ठिकाणी जाळपोळ आणि आंदोलन देखील करण्यात आले होते. या सर्व घटनांवरून काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे.