भुजबळ यांचं वय झालंय…एक दिवस जायचा टपकून वर; मनोज जरांगे पाटील यांचं धक्कादायक विधान
आता मुख्यमंत्री बोलले 10 तारखेचे उपोषण थांबवा. मात्र अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही. अध्यादेश काढल्यानंतर सगे सोयाऱ्याचा फायदा हा ओबीसी समाजासाठी सुधा होणार आहे. मुंबईला शांततेत जाणार हे बोललो होतो. शांततेत गेलो. आता कायद्याची अंमलबजावणी करा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला केलं आहे.
मनोहर शेवाळे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 8 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यातील कलगीतुरा अजूनही सुरू आहे. एकमेकांवर टीका करताना दोघांचाही तोल सुटतांना दिसत आहे. मनोज जरांगे यांनी आज पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. भुजबळ संपलेला माणूस आहे. त्यांचे आता वय झाले आहे. त्यांनी जास्त ताण घेऊ नये. जायचा एक दिवस टपकून वर. त्यांनी जरा सांभाळून राहिलेले बरं, असं धक्कादायक विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
मनोज जरांगे पाटील हे सप्तश्रृंगी गडावर आले होते. देवीचं दर्शन घेतल्यावर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे धक्कादायक विधान केलं. त्याला ( छगन भुजबळ ) सांगितले आहे की, माझ्या नादी लागू नको. पावणे दोन कोटी दाखले आढळले. सग्यासोयाऱ्यांचा अध्यादेश आलाय. बारा बलुतेदार सगळे मला भेटले. आम्हाला हा खाऊ देत नाही, अशी त्यांची तक्रार होती. एक घटना दाखवा ओबीसी चे कल्याण झाल्याची. त्याने बारा बलुतेदार यांची माफी मागितली नाही. हा सगळा सार बाहेर काढायचा असेल तर 10 तारखेचे उपोषण निर्णायक ठरणार आहे. त्याशिवाय पर्याय नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
सरकारला सुबुद्धी दे
मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला 15 तारखेपर्यंत सुबुद्धी द्यावी असं देवीकडे साकडे घातलंय आणि दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आहे त्याला पण भरघोस मदत मिळावी, असंही देवीला साकडं घातलंय, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
तो माझा मार्गच नाही
तुम्ही राजकारणात येणार का? असा सवाल जरांगे यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं. माझ्या मागे राजकारण नका लावू नका. तो माझा मार्गच नाही, तो आपला अजेंडाही नाही. गोरगरीब जनतेला मी न्याय मिळवून देणार आहे, असं जरांगे म्हणाले.
फक्त शिकून मोठ्ठं व्हा…
मनोज जरांगे यांनी तरुणांनाही सल्ला दिला. आता किती दिवस चालायचा हा लढा? 57 लाख नोंदी आल्या. आता 2 कोटी मराठे आरक्षणात गेले. आता फक्त शिकून मोठे व्हा. मी महिन्यापूर्वी सांगितलं आहे की, आरक्षण मिळेपर्यंत भरती करू नका आणि केली तर जागा रिक्त ठेवा, असंही ते म्हणाले.
त्यांना काही उद्योग नाही
सोशल मीडियावरून होणाऱ्या ट्रोलिंगवरही त्यांनी भाष्य केलं. सोशल मीडियावरील लोकांना काही उद्योग नाही. समाज अनेक वर्षानंतर एकत्र आला आहे. गैरसमज पसरवू नका. आपले मतभेद सोडून द्या. तुमच्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी मतभेद नको, असं जरांगे म्हणाले.