सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला मनोज जरांगे यांचं आव्हान; थेट मुलींनाच म्हणाले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर समाजाने पुन्हा एकदा विश्वास ठेवला आहे आणि 13 तारखेपर्यंत सगे सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्येप्रमाणे ते करतील अशी आशा असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
जालना – राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनानंतर मराठा समाजाला दिलेले आश्वासन पाळले पाहीजे. सरकारकडे यंत्रणा आहे. आम्ही आंदोलक आहोत. त्यामुळे आम्हाला विश्वास ठेवावा लागेल. सगे सोयरेची व्याख्या, हैदराबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेटबाबत येत्या 13 तारखेपर्यंत सरकार निर्णय घेईल असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. एक आंदोलक म्हणून समाजाची जवाबदारी आपण पेलतो, तर सरकारवर विश्वास ठेवावा लागतो. आडमुठी भूमिका घेतल्याने समाजाचे कल्याण होणार नाही. शंभूराजे देसाई ज्यावेळी आले होते, त्यावेळी समाजाला विचारून आपण सरकारला एक महिना वेळ दिला होता असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर समाजाने पुन्हा एकदा विश्वास ठेवला आहे आणि 13 तारखेपर्यंत सगे सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्ये प्रमाणे ते करतील आणि हैदराबाद गॅझेटसाठीही तीन पत्रं दिल्याचे विधानसभेत शंभूराजे देसाई यांनी सांगितले आहे. त्यामुळे 13 तारखेपर्यंत आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. सरकारने मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण दिले होते त्यानूसार मुलांनी जी प्रमाणपत्र काढले होते ते प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचण येत आहे आणि त्यामुळे मराठा समाज पुरता अडचणीत सापडला आहे.
विद्यार्थ्यांना आडकाठी आणू नका
सरकारचा डाव आहे की यावर्षी मराठा समाजाची पोरांची नुकसान करायचं आणि याबाबत मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की अशी विद्यार्थ्यांना आडकाठी आणू नका असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. सरकारने मुलींना मोफत शिक्षणाचा जो अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी होत नाही मग आदेश काढलाच कशाला असा सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकार निर्णय घेते पण त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे मराठा समाज नाराज होत आहे. मुलींच्या बाबतीत मोफत शिक्षणाचा जो निर्णय घेतला आहे, त्याचा आज मुलींना फायदा होत नाही आणि जर कोणाला लाभ झाला असेल तर त्या मुलींनी मला येऊन सांगावे असे आव्हानच जरांगे पाटील यांनी मराठा मुलींना केले आहे.