जालन्यात 40 गावांची नेत्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार
औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर इतर 40 गावांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. वर्षानुवर्षे पाण्याचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिल्याने स्थानिक ग्रामस्थांनी अखेर लोकसभा निवडणुकीच्या काळात आक्रमक भूमिका घेतली आहे. ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प […]
औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर इतर 40 गावांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे.
वर्षानुवर्षे पाण्याचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिल्याने स्थानिक ग्रामस्थांनी अखेर लोकसभा निवडणुकीच्या काळात आक्रमक भूमिका घेतली आहे. ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करावी, ही संबंधित गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र, निधीअभावी हे प्रकल्प तसेच धुळखात पडून आहेत. त्यामुळे किमान निवडणुकीच्या तोंडावर तरी आपला पाणी प्रश्न मार्गी लागावा या हेतूने ग्रामस्थांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.
रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. ते मागील वेळी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघात जालना, पैठण, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी पाणी प्रश्न गंभीर झाल्याने याचा थेट फटका विद्यमा खासदार दानवेंना बसू शकतो. जालन्यातून भाजप-शिवसेना युतीकडून रावसाहेब दानवे निवडणूक मैदानात आहेत. त्याच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासह राज्यातील इतर 14 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल.
संबंधित बातम्या:
भाजपच्या अनिल गोटेंनी दानवे, महाजनांची सभा उधळली
ना भाजप, ना शिवसेना, शांतीगिरी महाराजांचा रावसाहेब दानवेंच्या जावयाला पाठिंबा