मनोज जरांगे पाटील यांचा इशारा; राजकारणात आम्हाला ओढले तर लोकसभेला जे झाले तेच…
मराठा समाजावर अन्याय केला तर तुमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. मराठा समाजाला राजकारणात जायचे नाही. आमच्यापैकी कोणालाही राजकारण करायची इच्छा नाही. पण, आम्हाला राजकारणात ओढले तर तुमचा सत्यनाश झाल्याशिवाय राहणार नाही.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनचा लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात भाजपला फटका बसला. मराठा समाजाने विरोधात केलेल्या मतदानामुळे महायुतीचे उमेदवार विजयापासून वंचित राहिले. लोकसभा निवडणुकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एका आंदोलनचे हत्यार उपसले. मात्र, सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेऊन हे आंदोलन स्थगित करण्यात यश मिळविले. परंतु, जरांगे पाटील यांनी राज्यात पुन्हा एकदा सभा घेण्याचा धडाका सुरु केला आहे. हिंगोली जिल्ह्यातील इंदिरा गांधी चौकात मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी लोकसभेत जे झाले तेच पुन्हा विधानसभा निवडणुकीत होईल असा जाहीर इशारा दिला.
सरकारने आता शहाणपणाची भूमिका घेणे गरजेचे आहे. राज्यकर्त्यांनो मराठ्यांचा आक्रोश समजून घ्या. मराठा आणि कुणबी एकच आहे. त्यामुळे सरसकट कुणबी आरक्षण द्या. आम्ही दिलेली सगेसोयरे याची जी व्याख्या केली त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.
साडेचार तास झाले समाज उन्हात रस्त्यावर आहे. समाजावर जेव्हा संकट येईल तेव्हा हिंगोली जिल्हा ताकतीने उभे राहिल. मराठाचा आक्रोश आज रस्त्यावर आला आहे. समाजाने एकजूट होऊन आरक्षण देण्याची ही वेळ आहे. एकमेकांची उणीधूनी काढायची वेळ नाही. सरकारने आरक्षण दिले नाही तर पुन्हा मुबंईला जावे लागेल, असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला साद घातली.
वकील गुणरत्न सदावर्ते यांचे नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. काहींचे म्हणणे आहे की सगेसोयरे टिकणार नाही. ते आपल्यातले काही आहेत. त्यांची दुकान आता बंद झाली आहेत त्यामुळे ते असे बोलत आहेत. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले त्याविरोधात ते कोर्टात गेले. मराठा द्वेष याच्या मनात भरला आहे. पण, मराठ्यांसाठी मी पुन्हा लढायला तयार आहे. माझा जीव देखील द्यायला तयार आहे असे ते म्हणाले.
एकट्या भुजबळचे ऐकून समाजावर अन्याय केला तर याद राखा असा सरकारला इशारा देत ते पुढे म्हणाले, मराठा समाजावर अन्याय केला तर तुमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. मराठा समाजाला राजकारणात जायचे नाही. आमच्यापैकी कोणालाही राजकारण करायची इच्छा नाही. पण, आम्हाला राजकारणात ओढले तर तुमचा सत्यनाश झाल्याशिवाय राहणार नाही. काहीजण मला बोलतात की हा मिथुन आहे. अरे मी काहीही असेल तुला काय करायचे आहे, अशी टीकाही त्यांनी मंत्री भुजबळ यांचे नाव न घेता केली.