गेल्या आषाढीला विरोध, यावेळी पंढरपुरात मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत होणार
मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरु असल्यामुळे गेल्या आषाढी पूजेला मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्यास विरोध करण्यात आला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांनी घरातच विठ्ठलाची पूजा केली आणि पंढरपूरला जाणं टाळलं. मात्र मराठा समाजाकडून आता मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जाणार आहे.
पंढरपूर : मराठा आरक्षणाचा प्रश्न यशस्वीपणे सोडवल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पंढरपुरात आषाढी पूजेच्या वेळी स्वागत करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरु असल्यामुळे गेल्या आषाढी पूजेला मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्यास विरोध करण्यात आला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांनी घरातच विठ्ठलाची पूजा केली आणि पंढरपूरला जाणं टाळलं. मात्र मराठा समाजाकडून आता मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जाणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यात मोठमोठे मोर्चे शांततेत निघाले. काही काळानंतर काही ठिकाणी उद्रेक झाला होता. अशातच आषाढी एकादशीची विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करू न देण्याचा इशारा दिला. यामुळे पंढरपूरसह राज्यात वातावरण चिघळलं. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मुख्यमंत्री महापूजा करण्यासाठी आले नाहीत.
वर्षभराच्या काळात मराठा समाजाने जोरदार पाठपुरावा करून आरक्षण मिळावं यासाठी लढा दिला. हायकोर्टानेही मराठा समाजाला आरक्षण वैध ठरवलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिल्यामुळे यंदा आषाढी एकादशीला महापूजेसाठी येत असलेल्या मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत मराठा समाज करणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मोहन अनपट यांनी सांगितलं.
गेल्या आषाढी पूजेला विरोध
मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळलेलं असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा संघटनांनी घेतली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनीही न जाण्याचा निर्णय घेतला आणि घरातच विठ्ठलाची पूजा केली. आषाढीला विठ्ठलाची पूजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. पण ही परंपरा मोडण्यात आली होती.