मी पोहोचलो बेळगावात, तुम्ही का नाही? सीमेवर दिखावा करू नका, कोणत्या नेत्यानं दाखवून दिलं?
प्रत्येकाने अशा पद्धतीने आलो तरच हे आंदोलन यशस्वी होईल. कुणालातरी दाखवायचं म्हणून करत असाल तर ते चुकीचं आहे, अशी भूमिका या नेत्याने मांडली.
बेळगावः बेळगावात (Belgaum) जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची आज कर्नाटक सीमेवर धरपकड करण्यात आली. शेकडो मविआ कार्यकर्त्यांनी सीमेवर ठिय्या आंदोलन केलंय. मात्र ज्यांना बेळगावात जायचं, ते आमच्या पद्धतीने येऊ शकतात. उगाच सीमेवर देखावा करू नका, असं वक्तव्य मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील (Dilip Patil) यांनी केलंय.
गनिमी कावा पद्धत वापरून ते आज बेळगावात दाखल झाले आहेत. तेथे टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. नेत्यांनी दिखावा करून येण्याऐवजी इथे लोकांच्या पाठिशी उभं राहणं महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले.
सांगितलं ते करणारच, ही मराठा क्रांती मोर्चाची भूमिका आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांसह आम्ही बेळगावात पोहोचलो आहोत. इथे दडपशाहीचं वातावरण आहे.
बेळगाव येथे आज महाराष्ट्र एकिकरण समितीचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ऐनवेळी हा मेळावा रद्द करून समितीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
भारतात फिरायला कुणीही बंदी घालू शकत नाही. कर्नाटक सरकारने सुरु केलेल्या दडपशाहीचा आम्ही निषेध व्यक्त करतो. मराठी बांधवांच्या मागे मराठा क्रांती मोर्चा राहील, खांद्याला खांदा लावून आम्ही लढू, असं आश्वासन दिलीप पाटील यांनी दिलं.
महाविकास आघाडीने मोठी रॅली काढत बेळगावात येण्याचं नाट्य केलं. पण त्यांना यायचंच होतं तर आम्ही आलो त्या पद्धतीने का नाही आले? कोगनोळीपर्यंत येतात, रॅली करतात, शो करतात आणि निघून जातात…
प्रत्येकाने अशा पद्धतीने आलो तरच हे आंदोलन यशस्वी होईल. कुणालातरी दाखवायचं म्हणून करत असाल तर ते चुकीचं आहे, अशी भूमिका दिलीप पाटील यांनी मांडली.
दोन्ही राज्यातील जनतेला परस्परांच्या राज्यात येण्यास अडवणूक करू नये, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं असतानाही कर्नाटकचे सरकार मुजोरी सोडायला तयार नाही. म्हणजेच हे सरकार कायदा, संविधान मानत नाही, हाच अर्थ असल्याचा आरोप दिलीप पाटील यांनी केला.