औरंगाबाद : स्वतंत्र मराठवाडा आणि विदर्भाची पुन्हा एकदा हलगी वाजली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी हे दोन्ही प्रदेश स्वंतत्र राज्य करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीने मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील (Vinod Patil) यांनी तर सदावर्ते यांच्यावर येरवड्यातील रुग्णालयात उपचार करावा, अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी महामंडळाच्या आंदोलनानंतर स्वतंत्र राज्याची वकिली सुरु केली आहे. मराठवाडा आणि विदर्भ ही स्वतंत्र राज्य व्हावीत यासाठी शुक्रवारी त्यांनी उस्मानाबादमध्ये स्वतंत्र मराठवाड्यासाठी संवाद परिषद घेतली.
यावेळी सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाड्याची हाकटी पिटली. हा प्रश्न प्रशासकीय मार्गाने सूटला नाही तर मग कायदेशीर लढा देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विरोध करणाऱ्यांनाही कायदेशीर उत्तर देण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
त्यांना मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले आणि त्यांना विरोध केला. त्यानंतर ही आपल्या बाजूने अनेक मराठा कार्यकर्ते असल्याचा दावा सदावर्ते यांनी केला. त्यांनी स्वतंत्र मराठवाड्यासाठी हाक दिली.
या सर्व घडामोडींवर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी जहाल प्रतिक्रिया दिली आहे. मराठवाड्याचा अनुशेष बाकी आहे. विकासाचे प्रश्न आहेत. त्यासाठी राज्यकर्त्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
परंतु, सदावर्ते या मागण्यांच्या आडून मराठवाड्यातील तरुणांची माथी भडकवत असल्याचा आरोप त्यांनी केला. सदावर्ते यांना महत्व देत नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. त्यांनी तरुणांची माथी न भडकवण्याचा इशारा ही पाटील यांनी दिला.
सदावर्ते यांनी येरवडा येथे उपचार करुन घ्यावेत अशी बोचरी टिकाही त्यांनी केली. त्यांनी उपचारा दरम्यान स्वतंत्र राष्ट्राची मागणी करावी, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच सदावर्ते यांना विरोध करणाऱ्या तरुणांचे त्यांनी अभिनंदन केले.