5 जुलैपूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या, अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही, आमदार प्रसाद लाड यांचा ठाकरे सरकारला इशारा
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला इशारा दिलाय. 5 जूलैच्या अधिवेशनापूर्वी मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिलाय.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण आता अधिक तापताना दिसत आहे. अशावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज कोल्हापुरात मूक मोर्चाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना भूमिका मांडण्यासाठी भाग पाडलं. दुसरीकडे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला इशारा दिलाय. 5 जूलैच्या अधिवेशनापूर्वी मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिलाय. (Prasad Lad warns Thackeray government on Maratha reservation issue)
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने डोळे उघडावेत. आता सरकारने डोळे उघडले नाहीत तर मराठा समाज पेटून उठेल. महाविकास आघाडीने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा. 5 जूलैच्या अधिवेशनापूर्वी मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिलाय. मराठा समाजासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. मूक आंदोलनाचं परिवर्तन संघर्षात, संघर्षाचं आंदोलनात आणि आंदोलनाचं रुपांतर हिंसेत झालं तर त्याला ठाकरे सरकार जबाबदार असेल, असंही लाड यांनी म्हटलंय.
‘केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच भूमिका न घेतल्याने मराठा आरक्षण गेलं’
आज कोल्हापुरात मराठा मूक मोर्चा पार पडला. प्रकाश आंबेडकर या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधताना हा आरोप केला. दोराय स्वामींचं जजमेंट आहे. त्याला रिव्हिजीट करण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलली पाहिजे, असं सांगतानाच मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षण रद्द होण्यास केंद्र आणि राज्य सरकार कारणीभूत आहे. दोन्ही सरकारांनी वेळीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे हा प्रश्न उद्भवला, असं आंबेडकर म्हणाले.
आंदोलने सुरूच राहणार – संभाजीराजे छत्रपती
राज्य सरकारने आम्हाला चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. ही सकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे आम्हीही सरकारला सकारात्मक प्रतिसाद देणार आहोत. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जाण्याकरिता आम्हाला काही मुद्द्यांचा अभ्यास करून जावं लागणार आहे. त्यामुळे उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही. त्यांना कधी भेटायचं हे उद्या गुरुवारी ठरवू, असं सांगतानाच राज्य सरकारबरोबर आमच्या चर्चा होत असली तरी आंदोलनेही सुरूच राहणार आहेत, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
Prasad Lad warns Thackeray government on Maratha reservation issue