काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आज झोप लागणार नाही : गिरीश महाजन
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण कोर्टातही टिकलं, मात्र यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने दिलेलं आरक्षण कोर्टाने रद्द केलं होतं.
मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेलं 16 टक्के आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवलं. आम्ही दिलेलं आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर टिकवून दाखवू, असा दावा छातीठोकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा केला होता. हे आरक्षण दिल्यानंतर पाचच दिवसात याविरोधात पहिली याचिका दाखल झाली. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण कोर्टातही टिकलं, मात्र यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने दिलेलं आरक्षण कोर्टाने रद्द केलं होतं.
हायकोर्टाने आरक्षण कायम ठेवल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन आघाडी सरकारला टोला लगावलाय. आरक्षण देण्यामागे आमचं कोणतंही राजकारण नव्हतं. आम्हाला मराठा समाजाला न्याय द्यायचा होता. मराठा समाजाच्या राजकीय फायद्याचा आम्ही विचार करत नाही. या निर्णयामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आज झोप येणार नाही, असा टोला गिरीश महाजनांनी लगावलाय. आम्ही थातूरमातूर आरक्षण न देता कोर्टासमोर टिकणारं आरक्षण दिल्याचं ते म्हणाले.
आज माझ्या आयुष्याचं चीज झालं : चंद्रकांत पाटील
आरक्षण टिकल्यामुळे माझ्या आयुष्याचं चीज झालं अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मराठा समाज एकेकाळी गाव चालवायचा, मात्र आता त्याची परिस्थिती बदलल्यामुळे त्याला आरक्षणाची आवश्यकता आहे. राज्य सरकार आणि खासकरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी मोठे प्रयत्न केले आणि आज अखेर आरक्षण मिळालं याचा खूप आनंद आहे. आता 13 टक्के मिळालं याचा आनंद आहे, कारण आधी काहीच नव्हतं. निकाल संपूर्ण वाचल्यावर सुप्रीम कोर्टात जायचं की नाही ठरवू, असं ते म्हणाले.
VIDEO : चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया