राजे एकत्र आले याचा आनंदच, त्यांनी ओबीसींसाठीही प्रयत्न करावे, वडेट्टीवारांची अपेक्षा

| Updated on: Jun 14, 2021 | 4:17 PM

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन्ही राजे एकत्र आले याचा आम्हाला आनंदच आहे. मात्र, दोन्ही राजेंनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठीही प्रयत्न करावे, अशी अपेक्षा मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलीय.

राजे एकत्र आले याचा आनंदच, त्यांनी ओबीसींसाठीही प्रयत्न करावे, वडेट्टीवारांची अपेक्षा
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसनमंत्री
Follow us on

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी खासदार उदयनराजे यांची पुण्यात भेट घेतली. त्यावेळी दोन्ही राजेंमध्ये मराठा आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे यांनी मराठा समाजाचा उद्रेक झाला तर जबाबदार कोण? असा सवाल राज्य सरकारला विचारलाय. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन्ही राजे एकत्र आले याचा आम्हाला आनंदच आहे. मात्र, दोन्ही राजेंनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठीही प्रयत्न करावे, अशी अपेक्षा मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलीय. (Vijay Wadettivar welcomes the meeting of UdayanRaje and SambhajiRaje)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही राजे एकत्र आले याचा आम्हाला आनंदच आहे. कुठल्याही समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. पण राजेंनी ओबीसींसाठीही प्रयत्न केले पाहिजे. राजे हे सर्वांचे अर्थात सर्व समाजाचे असतात, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या भेटीचं स्वागत केलं. तसंच दोन्ही राजेंकडून ओबीसी समाजासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.

उद्रेक झाला तर जबाबदार कोण, उदयनराजेंचा सवाल

खासदार संभाजी छत्रपती यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणावर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 25 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर दोघांनीही मीडियाशी संवाद साधला. सुरुवातीलाच उदयनराजे यांनी संभाजीराजेंच्या आंदोलनाला आणि त्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं. मला सर्वांना सांगावसं वाटतं, आम्ही दोघं एकाच घराण्याचे आहोत. संभाजीराजे वंशज राजाराम महाराजांचे, वडील एकच… त्यामुळे दोन घराण्यांचा संबंध नाही, आम्ही एकच आहोत. संभाजीराजेंनी टेक्निकल मुद्दे मांडले. प्रत्येकाने ठरवायचं आहे, देशाची पुन्हा फाळणी करायची आहे का? देशाची फाळणी करण्याच्या दृष्टीने आजचे राज्यकर्ते प्रयत्नशील आहेत असा माझा आरोप नाही तर ठाम मत आहे. हे राज्याच्या बाबतीत आणि केंद्राबाबतीतही लागू आहे, असं उदयनराजे म्हणाले.

मुंबईत लोकलबाबत अद्याप निर्णय नाही – वडेट्टीवार

राज्यात अनलॉकिंगला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना वेगवेगळ्या सत्रावर अनलॉक करत आहोत. पण सर्वांनी लक्षात ठेवावं की कोरोना गेलेला नाही. मास्क वापरा, सोशल डिस्टनिंग पाळा, असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलंय. तसंच आपला जिल्हा कुठल्या लेव्हलमध्ये ठेवायचा हे आता जनतेनं ठरवायचं आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. मुंबईत अजून लोकलबाबत निर्णय झालेला नाही. कारण मुंबई सध्या तिसऱ्या लेव्हलमध्ये आहे. तिथली परिस्थिती सुधारली तर आम्हीही निर्णय घेऊ, असंही वडेट्टीवार म्हणालेत.

संबंधित बातम्या :

दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, उदयनराजे आणि माझं सर्वच मुद्द्यांवर एकमत: संभाजी छत्रपती

पक्ष-बिक्ष सोडा, आधी राज्याचं बघा, केंद्राचं मी बघतो : उदयनराजे

Vijay Wadettivar welcomes the meeting of UdayanRaje and SambhajiRaje