औरंगाबाद: राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. 1 डिसेंबरला त्यासाठी मतदान पार पडणार आहे. औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत (Aurangabad Graduate Election) राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्येच खरी लढत पाहायला मिळणार असली, तरी वंचित बहुजन आघाडी आणि मेष्टा संघटना आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
दरम्यान उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमधील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. भाजपचे शिरीष बोराळकर आणि प्रवीण घुगे यांच्यात आधीपासूनच रस्सीखेच सुरु होती. त्यात आता माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनीही या स्पर्धेत उडी घेतली आहे. त्यामुळे भाजपकडून पदवीधरचे तिकीट कुणाला मिळणारं यावरून उत्सुकता वाढली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी तीनही नेत्यांकडून जोरदार लॉबिंग सुरु आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे.
दुसऱ्या बाजूला औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतिश चव्हाण यांनी सलग तिसऱ्यांदा विजयी होण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात ‘सहविचार सभा’ घेण्यास सुरुवात केली आहे. तर भाजपकडून शिरीष बोराळकर यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. बोराळकर यांचा गेल्या निवडणुकीत सतिश चव्हाण यांनी पराभव केला होता. त्यामुळे बोराळकर आता अधिक आक्रमकपणे कामाला लागले आहेत.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप उमेदवारात होणार आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश इंगे मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. तर मेष्टा संघटनेकडून संजय तायडे निवडणूक लढवणार असल्याचं समजतंय. त्यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर शिवसेना आणि काँग्रेसने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम
या निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे. तर या जागांसाठी १ डिसेंबरला मतदान होणार आहे. निकाल ३ डिसेंबर रोजी घोषित केला जाणार आहे.
कोणत्या जागांसाठी निवडणूक?
औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून सतीश चव्हाण आणि नागपूरमधून अनिल सोले यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपला. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निवडणूक जिंकून विधानसभेवर गेल्याने पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा रिक्त राहिली. एकूण पदवीधर मतदारसंघाच्या तीन जागा रिक्त आहेत. तर शिक्षक मतदरासंघातून अमरावती विभातून श्रीकांत देशपांडे आणि पुणे विभागातून दत्तात्रय सावंत यांचा कार्यकाळसुद्धा जुलै महिन्यात संपला. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातून अमरावती आणि पुणे विभागाच्या दोन जागा रिक्त आहेत
संबंधित बातम्या
पदवीधर-शिक्षक मतदारसंघाची एक जागा काँग्रेसला द्या, निवडून आणण्याची जबाबदारी आमची : सतेज पाटील
Aurangabad | पदवीधर निवडणुकीत कोरोनाबाधितांना मतदान करण्याची मुभा
नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार जवळपास निश्चित, भाजपचं मात्र ठरता ठरेना!
(Marathwada Graduate Constituency : Big Competition between BJP leadersfor candidature)