आमदारकीची माळ उतरवली अन् कामाचा धडाका सुरू, सलग चौथा विजय, औरंगाबादेत विक्रम काळेंची प्रतिक्रिया काय?
आमदार झाल्यानंतर मी नेहमीच तत्काळ कामाला लागतो, अशी माहिती विक्रम काळे यांनी दिली.
औरंगाबादः मराठवाडा (Marathwada) शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)उमेदवार विक्रम काळे (Vikram Kale) यांनी पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला. सलग चौथ्यांदा आमदारकीची माळ गळ्यात पाडून घेणाऱ्या विक्रम काळे यांच्या विजयोत्सव गुरुवारी रात्री साजरा करण्यात आला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळीच विक्रम काळे यांनी आमदाराकीची माळ उतरवली अन् महत्त्वाच्या कामांना सुरुवात केली. विजयानंतर पहिल्यांदा त्यांनी प्रसिद्ध ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर आणि भद्रा मारुतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर याच परिसरातील शाळेला भेट दिली. तेथील शिक्षकांशी संवाद साधला. मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या लढतीत विक्रम काळे यांना 23 हजार 580 मतं मिळाली. तर प्रतिस्पर्धी किरण पाटील यांना 16 हजार 643 मतं मिळाली.
विजयाबद्दल काय प्रतिक्रिया?
शिक्षक मतदारांनी सलग चौथ्यांदा विक्रम काळे यांना निवडून दिलं. त्यामागील गणित नेमकं काय आहे, हे विक्रम काळे यांनी सांगितलं. ते म्हणाले, सरकार कोणतंही असलं तरी आमचं काम थांबत नाही. तीन वेळा आमदार झालो तरी आमदारकी कधी डोक्यात गेली नाही. मी त्यांच्यातलाच गुरुजी म्हणून सोबत राहिलो…
राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून एकनिष्ठपणे काम केलं. शिक्षक हाच पक्ष, हीच जात, हाच धर्म हीच माझी भूमिका ठेवली. त्यामुळे मराठवाड्यात तमाम शिक्षक बंधू-भगिनी आपल्या हक्काचा शिक्षक म्हणून माझ्यावर विश्वास दाखवतील ही खात्री होती. तो विश्वास खरा ठरल्याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया विक्रम काळे यांनी दिली.
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी…
आमदार झाल्यानंतर मी नेहमीच तत्काळ कामाला लागतो, अशी माहिती विक्रम काळे यांनी दिली. ते म्हणाले, ‘ निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशीच कामाला सुरुवात करतो. वेरुळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि भद्रा मारुती येथे नतमस्तक व्हायला गेले. त्यानंतर देवगिरी विद्यालयाला भेट दिली तसेच शिक्षकांशी संवाद साधला.
जुन्या पेंशन योजनेसाठी लढा…
सरसकट सर्वच शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी, अशी माझी भूमिका आहे. शेजारच्या चार राज्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रानेही हा निर्णय घ्यावा, यासाठी आम्ही अधिक तीव्र लढा उभारणार आहोत, अशी माहिती आमदार विक्रम काळे यांनी दिली.