डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारचा खूप दिलासा; मराठीतून मिळणार मेडिकलचे शिक्षण
शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण घेणे अधिक सोपे होणार आहे.
मुंबई : मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करताना इंग्रजी भाषेमुळे जीवतोड मेहनत घ्यावी लागते. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा देणारा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. आता महाराष्ट्रात मराठीतून मेडिकलचे शिक्षण मिळणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम हिंदीतून उपलब्ध करून देण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने नुकताच जाहीर केला. यानंतर महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण घेणे अधिक सोपे होणार आहे. 2023 या नव्या शैक्षणिक वर्षापासून ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
या निर्णयामुळे एमबीबीएससह आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून शिकता येणार आहेत.
2023 च्या शैक्षणिक वर्षांपासून हे अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध केले जाणार आहेत. विशेष म्हणजे मराठीतून वैद्यकीयचे शिक्षण घेणे बंधनकारक राहणार नाही. इंग्रजी की मराठी जे सोईस्कर पडेल असे माध्यम निवडण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.
मध्य प्रदेशनंतर आता महाराष्ट्रात राज्य भाषेत म्हणजेच मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असून सर्वच पॅथी, एमबीबीएसपर्यंतचा अभ्यासक्रम हा मराठीत देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे महाजन यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी बाबतचा न्यूनगंड दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचे महाजन म्हणाले. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी समित्या नेमण्यात आल्या आहेत. पुढील शैक्षणिक वर्षांपासून हा निर्णय लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे महाजन यांनी जाहीर केले.