राष्ट्रवादीच्या फुटीनंतरच्या भेटी शरद पवार यांच्याच निरोपावरून?; अजितदादा यांचा गौप्यस्फोट काय?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे खोटं बोलत असल्याचं अजितदादा म्हणाले. जातीय जनगणना बाबत आमच्या तिघांची चर्चा झाली आहे. आमचे एकमत झाले की आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल तयार होत आहे. शिंदे समितीचे काम चालू आहे, असं सांगतानाच मराठा आणि ओबीसीत भांडणं लागू नये. राज्यात कायद्या सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कर्जत | 1 डिसेंबर 2023 : गेल्या दोन दिवसांपासून कर्जतमध्ये राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू आहे. दोन दिवसांपासून पक्ष वाढीबाबतची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. या बैठकीत राष्ट्रवादीच्या फुटीवरही चर्चा झाली. पडद्यामागे नेमकं काय घडत होतं, काय घडलं याची माहिती सर्वांना देण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर राष्ट्रवादीच्या फुटीवरून थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच लक्ष केलं. शरद पवार यांनी कसं गाफिल ठेवलं याची माहितीच त्यांनी दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यावर आम्ही 2 जुलै रोजी शपथ घेतली. त्यापूर्वी 30 जूनला कार्यकारिणी झाली. एमईटीला पुन्हा बैठक झाली. आम्ही सर्व आमदार वेगळे झालो. आमचा निर्णय नेतृत्वाला आवडला नव्हता. 2 जुलै रोजी घेतलेला निर्णय आवडलेला नव्हता, तर 17 जुलै रोजी आम्हा सर्व मंत्र्यांना चव्हाण सेंटरला का बोलावलं? आमचा निर्णय आवडला नव्हता तर बोलावलं का? आधी सांगितलं सर्व मंत्री या. दुसऱ्या दिवशी आमदारांना आणा. आमदार जायला घाबरत होते. पण तरीही आम्ही आमदारांना घेऊन गेलो. चहापाणी झाली. तिसऱ्या दिवशी चर्चा होऊन सर्व सुरळीत होणार होतं. गाडी ट्रॅकवर आहे, गाडी ट्रॅकवर आहे असं सांगितलं जायचं. यात वेळ गेला, असं अजित पवार म्हणाले.
आम्ही सरकार चालवू शकत नाही का?
सर्व पूर्ववत पद्धतीने करायचं असा निरोप यायचा. पण प्रत्यक्षात काहीच घडत नव्हतं. तुम्ही आम्हाला गाफिल ठेवता का? मी फसवणूक म्हणणार नाही. त्यानंतर 12 ऑगस्ट रोजी मला एका उद्योगपतीने पुण्यात जेवायला बोलावलं. काही गोष्टींची चर्चा झाली. जेवणाला वरिष्ठ (शरद पवार) असतील. जयंत पाटील असतील असं मला त्या उद्योगपतीने सांगितलं. तिथेही चर्चा झाली. सुरळीत होईल सांगितलं गेलं. त्यानंतर दीड महिना झाला. करायचं नव्हतं तर गाफिल का ठेवायचं? कशासाठी करत आहात? कुणासाठी करत आहात? आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच काम करत आहोत ना. आम्ही राज्यात फिरू शकत नाही का? आम्ही सरकार चालवू शकत नाही का?, असा सवाल त्यांनी केला.
कामाला लागा
यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या. पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल. कोर्टबाजी आणि पक्षांतर बंदी वगैरे यात तुम्ही लक्ष देवू नका. तुम्ही कामं करा. आपल्याकडे लोकसभेसाठी 100 दिवस राहतील. घरी गेल्यावर कामालाच लागा, असं आवाहन त्यांनी केलं.
देशाचं सांगणार नाही, पण…
या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर यांनी देशात आणि राज्यात दंगली होतील असं भाष्य केलं. त्यावर त्यांनी भाष्य केलं. देशाचं मी काही सांगणार नाही. पण राज्यात असं काही होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असं अजित पवार म्हणाले.