Shrikant Shinde : रिक्षावालाच भारी, मर्सिडीज मधून पक्ष वाढू शकत नाही, श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला
बंडखोरी केलेल्या आमदारांवर गद्दार हा शिक्का पडलेला आहे. मात्र, नेमके गद्दार कोण हे आता शिवसेना आणि शिंदे गटाकडून पटवून सांगितले जातेय. शिवसेना पक्षाशी आणि ठाकरे कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसणारे हे गद्दारच असल्याचे आदित्य ठाकरे सांगत आहेत तर दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर मांडीला-मांडी लावून बसणारेच खरे गद्दार असल्याचा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.
वाशिम : (Rebel MLA) आमदारांच्या बंडानंतर पक्ष मजबुतीकरणासाठी (Aaditya Thackeray) आ. आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. मात्र, विरोधकांकडून त्यांच्यावर खोचक टीका केली जात आहे. आता तर खासदार तथा एकनाथ शिंदे यांचे पुत्र (Shrikant Shinde) श्रीकांत शिंदे यांनी तर आदित्य ठाकरेंच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्ष वाढवण्यासाठी रिक्षावाले, पान टपरीवालेच लागतात मर्सिडीज मधून पक्ष वाढत नाही असा टोला त्यांनी ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवर लगावला आहे. आतापर्यंत श्रीकांत शिंदे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केलेले नव्हते. पण आता दोन्ही गटातील अंतर वाढत असून आरोप-प्रत्यारोप हे वाढत आहेत. पक्ष संघटनेसाठी आदित्य ठाकरे यांचे प्रयत्न निष्फळ असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.
शिवसेनेतून बंड
गद्दार कोण? शिंदेंचा सवाल
बंडखोरी केलेल्या आमदारांवर गद्दार हा शिक्का पडलेला आहे. मात्र, नेमके गद्दार कोण हे आता शिवसेना आणि शिंदे गटाकडून पटवून सांगितले जातेय. शिवसेना पक्षाशी आणि ठाकरे कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसणारे हे गद्दारच असल्याचे आदित्य ठाकरे सांगत आहेत तर दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर मांडीला-मांडी लावून बसणारेच खरे गद्दार असल्याचा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. शिवाय ज्यांचे दाऊदसोबत संबंध त्यांच्याशी युती करणे बाळासाहेबांना पटले असते का असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
हिंदुत्वाचे विचार कायम जोपसणार
बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही हिंदुत्वाचे विचार सोडले नाहीत. हिंदुत्वाचा प्रचार आणि त्यासाठीच त्यांनी आपले आयुष्य खर्ची केले आहे. असे असताना आता त्यांच्याच विचाराला बाजूला सारण्याचा घाट शिवसेनेत सुरु झाला आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने शिंदे गटच पुढे घेऊन जात आहे. तर हे सर्वसामान्य जनतेलाही मान्य असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरुनही आता राजकारण वाढत आहे.
शिवसेना वाढवली कोणी?
आता पक्ष वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. मात्र, पक्ष अशापद्धतीने वाढत नाही, त्यासाठी रिक्षावाला आणि पान टपरीवालाच लागतो असे म्हणत शिवसेना वाढवली ही एकनाथ शिंदे यांनीच असेच श्रीकांत शिंदे यांना सुचित करायचे होते. तर आता मर्सिडीजमधून पक्ष वाढत नसतो असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप हे आता वाढत जात आहेत.