Milind Narvekar : शिवसेना फुटली, पण मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांची दोस्ती नाही तुटली!

| Updated on: Oct 22, 2022 | 2:06 PM

मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांची एकमेकांशी असलेली दोस्ती अधिक घट्ट कशी झाली? जीवलग मैत्रीची चर्चा तर होणारच

Milind Narvekar : शिवसेना फुटली, पण मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांची दोस्ती नाही तुटली!
एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे सचिव जरी असले तरी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर ते सातत्यानं चर्चेत आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका करत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच गटातील मिलिंद नार्वेकर यांनी 22 ऑक्टोबर रोजी केलेलं ट्वीट राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं. मिलिंद नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या ट्वीटमुळे आता मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) शिंदे  गटात जाणार आहेत का? असा प्रश्न पुन्हा विचारला जाऊ लागला. त्यावरुन राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडण्यास सुरुवात झालीय.

एकीकडे शिवसेना फुटली. पण शिवसेनेचे सचिव आणि एकेकाळी उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे मिलिंद नार्वेकर यांच्यातील दोस्ती तुटली नाही. ती आजही तशीच अबाधित आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात मिलिंद नार्वेकर हे नाव चर्चेत होतं. पण एका मर्यादेपर्यंतच. आता मात्र मिलिंद नार्वेकर यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाची बारीक नजर लागली आहे.

हे सुद्धा वाचा

बंडखोरीनंतरही ठाकरेंसोबतच

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर उघड-उघड शिंदे-नार्वेकर यांच्यातील भेटींनी अनेकदा चर्चांना उधाण आलं. पण शिंदे गटात जाण्याच्या चर्चा नार्वेकरांनी नेहमीच फेटाळून लावल्या. गुलाबराव पाटील यांनी एकदा नार्वेकर यांच्याबाबत सूचक वक्तव्यही केलं. नार्वेकर शिंदे गटात जातील, असे योगायोग जुळवून आणण्याचे प्रयत्नही झाल्याचं बोललं गेलं. पण नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या गटात राहिले.

उद्धव ठाकरेंचे पीए ते शिवसेनेचे सेक्रेटरी असा प्रवास केलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची आता पुन्हा चर्चा होतेय. निमित्त त्यांनी केलेल्या अमित शाहा यांना दिलेल्या शुभेच्छांच्या ट्वीटचं आहे. पण त्याआधी घडलेल्या 3 महत्त्वाच्या घडामोडी मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांची मैत्री किती घट्ट आहे, हे अधोरेखित करणाऱ्या ठरल्यात.

शिंदेंशी कधीपासून जवळीक?

2014 नंतर एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर एकमेकांच्या अधिक जवळ आल्याचं बोललं जातं. 2019मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले असले, तरीही मिलिंद नार्वेकर यांचा संपर्क हा एकनाथ शिंदे यांच्याशीच जास्त होता, असंही बोललं जातं. शिवाय 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात होत्या. या चर्चा शिंदेंनी तेव्हा फेटाळूनही लावल्या होत्या.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोर केली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मनधरणी करण्यासाठी, शिंदेंची समजूत काढण्यासाठी ज्या दोघांना पाठवलं, त्यात मिलिंद नार्वेकर हे पहिलं नाव होतं. सोबत रवींद्र फाटकही होते. सूरतला शिंदेंची भेट घेऊन नार्वेकर, फाटक रिकाम्या हाती परतले. त्यातील फाटक काही दिवसांनी स्वतःच शिंदे गटात गेले. पण नार्वेकर मात्र ठाकरेंसोबत राहिले.

शिंदे नार्वेकरांच्या घरी

गणेशोत्सवात नेते मंडळी एकमेकांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना दिसली. त्यात एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या घरच्या गणपतीला दिलेली भेट सगळ्यांच्या लक्षात राहिली.

मधल्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेहमीच असणारे मिलिंद नार्वेकर दिसेनासे झाले होते. त्यावरुन अनेकांनी शंका घेतली. नार्वेकर ठाकरेंपासून दूर तर झाले नाहीत ना, असा प्रश्नही विचारला जाऊ लागला होता.

टेंभी नाका, रश्मी वहिनी आणि तो किस्सा…

ठाण्यातील टेंभी नाक्याच्या देवीला उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे गेल्या. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात रश्मी ठाकरेंच्या सोबत मिलिंद नार्वेकर दिसले नव्हते. ही बाबही अनेकांच्या लक्षात आली होती. पण कुजबूज वेळीच थांबली आणि चर्चा फार लांबली नाही. विशेष म्हणजे रश्मी ठाकरे ज्या दिवशी टेंभी नाक्याला जाणार त्याच्या आदल्याच दिवशी नार्वेकर यांनी तिथे हजेरी लावली होती.

उद्धव ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर जोरदार प्रहार करणं सुरु आहे. पण मिलिंद नार्वेकर हे नाव महाराष्ट्राच्या चर्चेत ही काही आजची गोष्ट नाही. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत झालेलं फोनवरील संभाषण असेल, नारायण राणेंनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर केलेली टीका असेल किंवा मग आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राहून उघडपणे साधलेली जवळीक असेल. मिलिंद नार्वेकर आणि शिवसेनेशी त्यांचा असलेला संबंध वरचेवर चर्चेत आलेला आहे.

मिलिंद नार्वेकर कोण आहेत?

मूळचे मालाडमधील शिवसैनिक ही मिलिंद नार्वेकर यांची सुरुवातीची ओळख. मालाड येथील लिबर्टी गार्डन परिसरात शिवसेनेचे गटनेते म्हणून सुरुवातीला त्यांनी काम केलं.

शाखा प्रमुख होण्याची इच्छा असलेल्या या सामान्य शिवसैनिकाला उद्धव ठाकरेंनी स्वीय्य सहाय्यक म्हणून जबाबदारी दिली. नार्वेकरांनीही ती आनंदाने स्वीकारली होती. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून अनेक वर्ष ओळख असणारे मिलिंद नार्वेकर शिवसेनेतल्या प्रमुख नावांपैकी एक.

उद्धव ठाकरे यांचे यांचे दौरे, नेत्यांच्या भेटी, गाठी, फोनवरुन होणारे सर्व संपर्क आणि इतर संवादाची जबाबदारी नार्वेकरांवर असायची. उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यध्यक्ष झाल्यानंतर नावर्केरांचीही शिवसेनेतील ताकद वाढली. पुढे नार्वेकर यांना शिवसेनेचं सचिव पद देण्यात आलं. काही वर्षांपूर्वी त्यांना विधान परिषदेवर घेतलं जाणार का, अशाही चर्चा रंगल्या होत्या.