औरंगाबाद : केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर औरंगाबाद (Aurangabad)शहर आणि जिल्ह्याचं नाव आता छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) करण्यात आलंय. या नामांतराला तीव्र विरोध करणाऱ्या एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारने नामांतराला मंजुरी दिल्यानंतर हा मुद्दा हायकोर्टात उपस्थित करण्यात आला होता. कोर्टात हे प्रकरण असताना सरकारने नामांतराचा निर्णय घेऊन टाकणं, योग्य नाही अशी प्रतिक्रिया खा. जलील यांनी दिली आहे. पण आता निर्णय दिलाच आहे तर सरकारला माझे काही सवाल आहेत. त्याची उत्तरं शिंदे-फडणवीस तसेच केंद्र सरकारने द्यायलाच हवीत, असं आवाहन खा. जलील यांनी केलंय. नवी मुंबईत एमआयएमच्या राष्ट्रीय परिषदेत खा. इम्जियाज जलील बोलत होते.
तुमच्याकडे दाखवण्यासारखं काही नसेल तेव्हा अशा प्रकराचं राजकारण करून लोकांचं लक्ष विचलित केलं जातं, असा आरोप खा. इम्तियाज जलील यांनी केला आहे.
ही प्रक्रिया आधीच हायकोर्टात प्रलंबित होती. असे असतानाही केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही कोर्टालाही जुमानणार नाही, हेच दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हे दुर्दैवी आहे..अशी प्रतिक्रिया खा. जलील यांनी दिली आहे.
दरम्यान, केंद्र सरकाने मंजुरी दिलेली असली तरीही आम्ही औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध कायमच आहे. यासाठीची आमची कायदेशीर लढाई सुरु आहे. ती लढाई आम्ही सुरूच ठेवणार आहोत, असं खा. जलील यांनी सांगितलं आहे. एखाद्या इतिहासाच्या पुस्तकातील काही पानं तुम्ही फाडून टाकू शकता, मात्र तो इतिहास कधीही पुसला जाऊ शकत नाहीत. औरंगाबाद शहराला अशाच प्रकारे ऐतिहासिक महत्त्व आहे. जगविख्यात अशा पुरातन वास्तु औरंगाबादमध्ये आहेत. मात्र नामांतराच्या या प्रक्रियेत होणारा खर्च सर्वसामान्यांना झेलावा लागणार, अशी प्रतिक्रिया खा. इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.
दरम्यान, औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याने शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी या निर्णयाचं स्वागत केलं जातंय. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने औरंगाबादच्या टीव्ही सेंटर परिसरात फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. तर उस्मानाबादेतही शिवसेनेच्या वतीने आनंद साजरा करण्यात आला.