राष्ट्रवादीच्या आमदाराने ‘भावी मंत्री’ संबोधलं, दानवे म्हणाले ‘मी पुन्हा येईन!’
राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी रावसाहेब दानवेंचा भावी मंत्री असा उल्लेख केला, त्यावर दानवेंनी "मी पुन्हा येईन, पण पुढच्या वर्षी" असा आशावाद व्यक्त केला.
लातूर : केंद्रीय ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ‘मी पुन्हा येईन! पण पुढच्या वर्षी’ असं म्हणत जोरदार बॅटिंग केली. लातूरमधील कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या आमदाराने ‘भावी मंत्री’ असा उल्लेख केला असता, दानवेंनीही उत्तर दिलं. दानवेंची टोलेबाजी देेवेंद्र फडणवीसांना उद्देशून आहे, की राष्ट्रवादीच्या आमदाराला, हा मात्र चर्चेचा विषय होता. (Raosaheb Danve Me Punha Yein)
लातूर जिल्ह्यातल्या रेणापूरमध्ये एका खासगी संस्थेच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे बोलत होते. राष्ट्रवादीच्या तिकीटावर विधानपरिषदेवर निवडून आलेले शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी रावसाहेब दानवेंचा भावी मंत्री असा उल्लेख केला. त्याचाच धागा पकडून दानवे भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी “मी पुन्हा येईन, पण पुढच्या वर्षी” असा आशावाद व्यक्त केला.
रावसाहेब दानवे माझं घर फोडत आहेत, जावयाचा सासऱ्यावर गंभीर आरोप
विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने वापरलेलं ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य सर्वत्र चर्चेचा विषय ठरलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री जयंत पाटील यांनी विधीमंडळात लगावलेल्या कानपिचक्या असोत, की सर्वसामान्यांनी सोशल मीडियावरुन काढलेले चिमटे असो. मात्र पहिल्यांदाच भाजप नेत्याने ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य वापरत टोलेबाजी केली. ‘मी पुन्हा येईन’चा आशावाद आता एका वर्षाने पुढे ढकलला गेला आहे, असं दानवेंना सुचवायचं असावी, अशी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा यामध्ये आम्ही कधी चांगला परफॉर्मन्स देऊ शकलो नाही, तरी लोक आम्हाला निवडून देत आहेत, म्हणून नेमकी गुणवत्ता कशात असते, हे मला कधी कळले नाही, असंही रावसाहेब दानवे भाषणात म्हणाले.
‘जो हाऊसमध्ये चांगला परफॉर्मन्स देतो, तो लोकांमधून निवडून येत नाही आणि जो चांगला परफॉर्मेन्स देत नाही, तो मात्र लोकांमधून निवडून येतो. असं का होतं, हे मला कळत नाही’, असं रावसाहेब म्हणाले. (Raosaheb Danve Me Punha Yein)