VIDEO | बॉम्ब कुठंय? धनंजय मुंडेंचे विधानसभेत हातवारे, विरोधकांना विचारणा, दंडही थोपटले!
विरोधकांचा बॉम्ब कुठंय, असा सवाल अत्यंत बोलक्या हातवाऱ्यांद्वारे धनंजय मुंडे यांनी केला. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर विरोधकांना इशारा देत दंडही थोपटले.
मुंबईः सोमवारी विधिमंडळाचे सकाळच्या सत्रातील अधिवेशन सुरु होते. मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) बोलत विदर्भ पाटबंधारे महामंडळाविषयी होते. पण पाटील यांच्या विषयापेक्षा विधानसभेतील कॅमेऱ्यांनी जास्त लक्ष वेधले ते त्यांच्या मागे बसलेल्या धनंजय मुंडेंकडे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) अशा काही प्रकारे हातवारे करत होते की, काहीही न बोलता ते मोठा चर्चेचा विषय बनले. धनंजय मुंडे कुणाला तरी उद्देशून, हातवारे करून काही तरी विचार होते. मुंडेंचे हातवारे एवढे बोलके होते की, त्यांचा प्रश्न कुणाच्याही लक्षात येतो. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सभागृहात बॉम्ब (Fadanvis Bomb) फोडणार होते, काय झालं? बॉम्ब कुठंय, असा प्रश्न धनंजय मुंडे विचारत होते. धनंजय मुंडे यांनी हातवारे करून विचारलेल्या या प्रश्नामुळे ते चांगलेच चर्चेत आहेत.
विरोधकांचा बॉम्ब कुठंय?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात सत्ताधाऱ्यांवर आरोप करणारा व्हिडिओ बॉम्ब विधानसभेत सादर केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. आठवड्याच्या अखेरीस देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले, त्यामुळेही राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतरही आगामी आठवड्यात आणखी बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी दिला होता. त्यामुळे विधानसभेत देवेंद्र फडणवीस आज काय बोलतात, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. मात्र फडणवीस यांनी आज अगदी काही मिनिटंच घेतले आणि ते खाली बसले. त्यानंतर मात्र सभागृहात विरोधी पक्षांचा बॉम्ब कुठे आहे, कधी पडणार? असे प्रश्न खाणाखुणांनी, दबक्या आवाजातून विचारला जाऊ लागला.
धनंजय मुंडेंचे हातवारे चर्चेत
विरोधी पक्षांनी तर सोमवार-मंगळवारी सत्ताधारी पक्षाविरोधात आणखी मोठा बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. मात्र सोमवारी सकाळच्या सत्रात देवेंद्र फडणवीसांनी फार काहीही वक्तव्य केलं नाही. त्यामुळे विरोधकांचा बॉम्ब कुठंय, असा सवाल अत्यंत बोलक्या हातवाऱ्यांद्वारे धनंजय मुंडे यांनी केला. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी दंडही थोपटले. बॉम्ब फोडायला हिंमत लागते, असंच काहीसं त्यांना म्हणायचं होतं, असं वाटतं. हे करताना त्यांनी कॉलरही टाइट केली. धनंजय मुंडे यांचा विधानसभेतला हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. सत्ताधारी पक्षदेखील फडणवीसांच्या पुढच्या बॉम्बची किती आतुरतेने वाट पहात आहेत, हेच यातून स्पष्ट होतंय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
इतर बातम्या-