नंदुरबार ZP निकाल : कॅबिनेट मंत्री के सी पाडवी यांची पत्नी शिवसेनेकडून पराभूत
तोरणमाळ गटात शिवसेनेचे धडगाव तालुकाप्रमुख गणेश पराडके यांनी हेमलता पाडवींना पराभूत केलं.
नंदुरबार : कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेस आमदार अॅड. के. सी. पाडवी यांना मोठा धक्का बसला आहे. नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत के. सी. पाडवी यांची पत्नी शिवसेना उमेदवाराकडून पराभूत (Minister KC Padvi Wife Defeat) झाली.
काँग्रेसच्या तिकीटावर जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या हेमलता के पाडवी यांना पराभवाचा धक्का बसला. तोरणमाळ गटात शिवसेनेचे धडगाव तालुकाप्रमुख गणेश पराडके यांनी हेमलता पाडवींना पराभूत केलं.
के सी पाडवी यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसची धुरा होती. त्यांची पत्नीच निवडणूक रिंगणात असल्याने ही लढत प्रतिष्ठेची झाली होती.
के सी पाडवी हे नंदुरबारमधील अक्कलकुवा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये के सी पाडवी यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात के सी पाडवी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
नागपूर ZP निकाल : गडकरी-बावनकुळेंच्या मूळगावीच भाजपला धोबीपछाड
के. सी. पाडवी यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेसने पहिल्यांदाच के. सी. पाडवी यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे.
अॅड. के. सी. पाडवी मंत्रिपदाची शपथ घेताना त्यांनी लिखित शपथेच्या व्यतिरिक्त मतदारांचे आभार मानत राज्यघटनेविषयी वक्तव्य केलं. त्यानंतर संतापलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाडवींना पुन्हा शपथ घ्यायला लावली होती.
एकीकडे मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याची आनंदवार्ता असतानाच पत्नीच्या पराभवाचं शल्य (Minister KC Padvi Wife Defeat) के सी पाडवी यांना बाळगावं लागणार आहे.
नागपूर जिल्हा परिषदेत भाजपची दाणादाण
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का बसला आहे. नितीन गडकरींचं मूळ गाव असलेल्या धापेवाडा आणि बावनकुळेंचं मूळ गाव कोराडीमध्ये भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं.
धापेवाड्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झाले आहेत. बावनकुळेंना तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या मतदारांनी भाजपला मतदान केलं.