मुंबई : ठाकरे सरकारमधील पहिल्या मंत्र्याची विकेट पडली. शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Maharashtra Minister Sanjay Rathod) यांना आपला राजीनामा ‘मातोश्री’वर पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide case) संजय राठोड यांचं नाव आल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारत राठोडांनी आपला राजीनामा पाठवला. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारणार का, भाजपच्या मागणीनुसार राठोडांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई केली जाणार का, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. (Minister Sanjay Rathod resigns will CM Uddhav Thackeray accept)
मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने रितसर तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. इतकं सगळं होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचं नावही उघड झाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारवाई करणार का?
संयमी पण कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं. मात्र संजय राठोड यांनी पाठवलेला राजीनामा उद्धव ठाकरे स्वीकारतील का, असा प्रश्न विचारला जात आहे. संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे का पाठवला नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. उद्धव ठाकरे यांनी कारवाई केल्यास राठोड हे पहिलेच मंत्री ठरतील. महत्त्वाचं म्हणजे संजय राठोड हे महाविकास आघाडीचे मंत्री असले तरी ते शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे स्वत:च्या मंत्र्यावर कारवाई करुन कडक इशारा देणार का, असा सवाल आहे.
नेमका कोणत्या प्रकरणात राजीनामा?
संजय राठोड यांनी नेमका कोणत्या प्रकरणात राजीनामा दिला हे एव्हाना राज्याला माहिती झालं आहे. मूळची परळीची असलेली 22 वर्षाची पूजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री एक वाजताच्या आसपास तिने सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पूजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पूजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलिसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.
ऑडिओ क्लिपमधून उलगडा ?
पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधित आहेत का, याचाही खुलासा किंवा माहिती ना पोलिसांनी दिली, ना पूजाच्या कुटुंबियांनी. पण त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना देत असल्याचं समजतं. हे संपूर्ण प्रकरण तापत गेलं आणि ते संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर येऊन पोहोचलं.
पूजाला न्याय मिळणार?
दरम्यान, या प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा तर घेतला आहे. मात्र आता संजय राठोड यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का हे पाहावं लागणार आहे. कारण ना राजीनाम्याने, ना संजय राठोड यांना शिक्षा केल्याने, पूजा परत येऊ शकेल. मात्र कायदा हा सर्वांसाठी समान आहे हे जर पुन्हा एकदा सिद्ध करायचं असेल तर संबंधित मंत्र्यांवर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी विरोधक करत आहेत, त्यात गैर काहीच नसावं.
शिवसेनेत दोन गट
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरुन शिवसेनेत दोन गट पडल्याची चर्चा आहे. राठोड यांनी राजीनामा देऊ नये, असे सेनेतील एका गटाचे म्हणणे आहे. यापैकी एक गट नैतिकता जपण्यासाठी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशा मताचा आहे. तर दुसरा गट संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ नये, असे म्हणत आहे.
संजय राठोड मौन सोडण्याची चिन्हं
संजय राठोड रविवारपर्यंत मुंबईत होते. परंतु त्यानंतर ते अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती आहे. पोहरादेवी देवस्थानात गुरुवारी ते या विषयावर मौन सोडण्याचीही शक्यता आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण समोर आल्यापासून राठोड नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या चर्चगेटमधील घरी ते नव्हते, तर फोनवरही त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही
कोण आहेत संजय राठोड?
संजय राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील बडे नेते आहेत
शिवसेनेचे नेते संजय राठोड हे पहिल्यांदा 2004 साली यवतमाळमधील दिग्रस विधानसभा मतदार संघातून विजयी झाले.
त्यानंतर 2009 आणि 2014 अशा दोन्ही वेळा पुन्हा संजय राठोड आमदार म्हणून विधानसभेत गेले.
फडणवीसांच्या 2014 साली राठोड यांच्याकडे यवतमाळच्या सहपालकमंत्रिपदासह महसूल राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली.
2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा, त्यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला.
(Minister Sanjay Rathod resigns will CM Uddhav Thackeray accept)
संजय राठोडांच्या मुसक्या आवळा, चित्रा वाघ यांची पहिली आक्रमक मागणी
संजय राठोड यांच्या मुसक्या आवळा अशी पहिली आक्रमक मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. चित्रा वाघ यांनी पहिल्यांदा संजय राठोड यांचं थेट नाव घेतलं होतं. चित्रा वाघ म्हणाल्या, “पूजा चव्हाण या युवतीची आत्महत्या नसून, हत्याच असल्याचे बरेच अपडेट्स गेल्या दोन दिवसात आपल्यासमोर आले आहेत. त्यामध्ये जवळपास दहा ऑडिओ क्लिप, फोटोज समोर आलं आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तिला आत्महत्येपासून परावृत्त करण्यापासून ते आत्महत्या झाल्यानंतर तिचा दरवाजा तोड पण मोबाईल ताब्यात घे, असं मंत्री अरुण राठोड नावाच्या माणसाला सांगत आहेत. हे आपण ऐकलं. पोलीस याबाबत काहीच स्पष्टता देत नाहीत. पूजा राठोड हिच्या परिवारावर दबाव असू शकतो. पोलिसांनी सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून, सुमोटो अंतर्गत हा गुन्हा दाखल करायला हवा. या फोटोज, ऑडिओ क्लिप्सना गेले दोन दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या, सोशल मीडियातून येणाऱ्या बातम्या यांचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. यासाठी राजकीय इच्छाशक्ती तितकीच महत्त्वाची आहे.”
“संजय राठोडांची हकालपट्टी व्हायला हवी”
उद्धव ठाकरे सरकार चालवतात की माफियांची टोळी, हा प्रश्न आहे. वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा नाही, तर त्यांची हकालपट्टी व्हायला हवी होती. राठोडांना ताबडतोब अटक करायला हवी होती. धनंजय मुंडेंना तीन-तीन बायका, त्यांना शरद पवार वाचवतात. संजय राठोड यांनी 22 वर्षांच्या तरुणीच्या आयुष्याचा सत्यानाश केला आहे, त्यांना उद्धव ठाकरे वाचवतात, असा घणाघाती आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवर पाठवलेला राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा.
कारण एकाने ‘मारल्यासारख करायचं, दुसऱ्याने रडल्यासारख करायचं’ असं होता कामा नये. तसेच राजीनामा दिल्यानंतर निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी. @CMOMaharashtra @BJP4Maharashtra— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) February 16, 2021
संबंधित बातम्या :
अखेर संजय राठोडांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला
राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही, आता तातडीने गुन्हा दाखल व्हावा: निलेश राणे
मुंडेंच्या तीन बायका, तरी पवारांनी वाचवलं, आता राठोडांना ठाकरे वाचवतात, सोमय्या आक्रमक
Minister Sanjay Rathod resigns will CM Uddhav Thackeray accept)