चंदक्रांत खैरेंची दानवेंवर नाराजी, आता लगेच शिंदेंच्या सेनेकडून अधिकृत ऑफर; शिरसाट म्हणाले, त्यांच्यासाठी…
चंद्रकांत खैरे यांना एकनाथ शिंदे याच्या पक्षाकडून खुली ऑफर आली आहे. संजय शिरसाट यांनी खैरे यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरावाजे नेहमी खुले आहेत, असं म्हटलंय.

Sanjay Shirsat And Chandrakant Khaire : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अनेक घडामोडी घडत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यानंतर आता शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी खैरे यांना खुली आणि अधिकृत ऑफर दिली आहे. खैरे यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे नेहमी खुले असतील, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता संभाजीनगरात आगामी काळात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
त्यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे खुले
संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना “चंद्रकांत खैरे याच्याबद्दल मला कधीही वैयक्तिक राग नाही. त्यांनी प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केलेली आहे. त्यामुळेच मी आधीही सांगितलं आहे की त्यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे खुले आहे. इतरांसाठी दरवाजे खुले नाहीत. मी त्यांच्या समोर ही अधिकृत ऑफर देत आहे, असे म्हणत शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याची खुली ऑफर दिली आहे, असे शिरसाट म्हणाले.
आमचाही फक्त खैरेंवर राग नाही
तसेच, “आम्ही हिंदुत्त्वाची कास घेतलेली आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार चालवलेले आहेत, हे खैरे यांनी मान्य केलेले आहे. त्यामुळेच खैरे यांचा आता आमच्यावर राग नाही. आमचाही फक्त खैरेंवर राग नाही. आता कोणती कास धरायची हे खैरे यांनी ठरवलं पाहिजे,” असा सल्लाही शिरसाट यांनी दिला.
संभाजीनगरात त्यांना कोणी जवळ करत नाही
“खैरे यांना नेहमी अडचणीतच टाकण्यात आलं. त्यांना दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पाडण्यात आलं. त्यांचा जाणूनबुजून कार्यक्रम करण्यात आला आहे. त्यामुळे मातोश्री सोडता येत नाही आणि संभाजीनगरात त्यांना कोणी जवळ करत नाही, अशी खैरे यांची अवस्था झालेली आहे,” असंही विधान शिरसाट यांनी केलंय.