..तर मुंबईत आंदोलनादरम्यान परिस्थिती बिघडू शकते, शंभुराज देसाई यांची भीती
सरकार मराठा समाजाच्या विरोधात नाही, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईचे आंदोलन स्थगित करावे अशी विनंती मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. मुंबईत होणाऱ्या या आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर राज्य सरकारला प्रयत्न करावा लागेल असे देखील देसाई यांनी म्हटले आहे.
सातारा | 19 जानेवारी 2024 : मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी उद्या 20 जानेवारीपासून ‘चलो मुंबई’ असा नारा दिला आहे. अंतरवाली सराटीतून मराठा लाखोच्या संख्येने मुंबईच्या दिशेने उद्यापासून कूच करणार आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार आता बॅकफूटवर गेले आहे. आम्ही मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी सर्वातोपरी प्रयत्न करीत असल्याने जरांगे यांनी मुंबईत येणे टाळावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलन टाळावे. जर आंदोलकांकडून अनावधानाने चुकीचे पाऊल पडले तर मुंबईतील परिस्थिती बिघडू शकते असे वक्तव्य मंत्री शंभुराज देसाई यांनी केले आहे.
मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून ( 20 जानेवारी ) मुंबईच्या दिशेने निघण्याचे आवाहन मराठा समाजाला केले आहे. असेल ते वाहन घेऊन मराठ्यांनी घरातील बेसन पीठ घेऊन मुंबईच्या दिशेने कूच करावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे. मराठ्यांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी या आंदोलनासाठी यावे, मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी ही शेवटची संधी आहे असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुंबईत मराठे चारही दिशांनी शिरतील असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. यानंतर राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. जरांगे यांनी मुंबईला येणे टाळावे असे आवाहन केले आहे.
‘सगेसोयरे’ बाबत अध्यादेश काढू
मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण देण्यासाठी ‘सगेसोयरे’ याची जी व्याख्या केली आहे. त्याबाबत सरकार अध्यादेश काढावा लागला तरी सरकार सकारात्मक आहे आणि सरकार मराठा समाजाच्या विरोधात नाही, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळणार असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईचे आंदोलन स्थगित करावे अशी विनंती मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. मुंबईत होणाऱ्या या आंदोलनादरम्यान जर अनावधानाने चार दोन माणसांमुळे परस्थिती हाताबाहेर जावू शकते. जर परस्थिती हाताबाहेर गेली तर ती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारला प्रयत्न करावा लागेल. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी त्याचे आंदोलन स्थगित करावे असेही देसाई यांनी म्हटले आहे.