मोठी बातमी… तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील; आदित्य ठाकरे यांचं मोठं विधान; मागणी काय?
राज्यात महायुतीचे सरकार स्थानापन्न होऊन कामालाही लागले आहे. या सरकारचे खातेवाटप देखील पूर्ण झालेले आहे. आता या सरकारची कारकीर्द सुरु होत असतानाच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. काय आहे या पत्रात....
महायुतीच्या नव्या सरकारचे खातेवाटप अखेर पूर्ण झाले असून नवीन मंत्री आता कामाला लागले आहेत. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ ची शपथ अखेर पूर्ण केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अखरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नागपूर येथील अधिवेशनात स्वत: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे.
आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक आवाहन केले आहे.राज्यातील वाढत्या पोस्टर,बॅनर- होर्डिंग संस्कृतीबद्दल या पत्रात नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर बंदी घालण्याबाबत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहीलेले आहे.
आपण साल २०२५ मध्ये पदार्पण करीत आहोत. आपण लोकसेवेचा संकल्प करताना सर्व पक्षीय भेदभाव आणि विचारसरणी बाजूला ठेवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी राजकीय पोस्टरबाजी, बॅनरबाजी आणि होर्डींगबाजीवर प्रतिबंध घालण्याचा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा निर्णय घेऊ शकतो असे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
येथे पाहा ट्वीट –
सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आपल्या शहरांमध्ये राजकीय होर्डिंग लावण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यास मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ह्यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे. फडणवीस जी ह्यांनी ‘नो बॅनर’ उपक्रमासाठी पाऊल उचलले, तर आम्ही देखील त्यांना साथ देऊ आणि त्याचे… pic.twitter.com/oU8vKZdgmM
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 24, 2024
बीएमसीने निवडक पोस्टर हटविली
गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या राजकीय गोंधळामुळे, प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यात हजारो राजकीय पोस्टर (कायदेशीर आणि बेकायदेशीर) पाहायला मिळत आहेत. एक नागरिक म्हणून हे पाहून खेद वाटतो आणि एक व्यक्ती म्हणून शहर विद्रुप करणाऱ्या अशा पोस्टर्सचा सर्वांनाच त्रास होतो आहे. गेल्या दोन वर्षांत बीएमसीकडून निवडक पोस्टर हटवण्यात आली, तर सत्ताधारी पक्षांची पोस्टर मात्र तशीच दिसत आहेत.
या बालिश राजकीय स्पर्धेला बाजूला ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी बेकायदेशीर पोस्टर, बॅनर आणि होर्डिंग न लावण्याचा निर्णय घेतला तर नागरिकांना आपण मोठा दिलासा देऊ शकतो. यामुळे आपली शहरे स्वच्छ दिसतीलच, शिवाय आपल्या कार्यकर्त्यांनाही अशा खर्चातून दिलासा मिळेल. जगात कुठेही अशा प्रकारची राजकीय पोस्टर लावून शहरे विद्रुप केली जात नाहीत. त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की आपण या दिशेने पहिले पाऊल टाका, आम्हीही तुमच्या पाठीशी आहोत.
आपण सत्तेत मुख्यमंत्री आणि आम्ही विरोधी पक्ष म्हणून असलो तरी ह्या गोष्टींवर आपण एकत्र काम केलेच पाहिजे. आपण या विषयी बैठक बोलावली किंवा सर्व पक्षांना पत्र लिहिले, तर मी, माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील असेही आदित्य ठाकरे यांनी या पत्रात लिहीलेले आहे.