केंद्र सरकार अपयशी, भिकारXX योजना बंद करा; बच्चू कडू कडाडले
हे राजकारण आहे. जिसके हाथ में चाबूक रहता है उसकाही घोडा होता है. उसकाही टांगा होता है. अशोक चव्हाण हे विकासाच्या जाळ्यात अडकले आहेत. राजकारणात कुणी कुणाचा दोस्त किंवा दुश्मन नसतो. राजकारणात कुणी दोस्तीही करू नये आणि दुश्मनीही करू नये. मस्त आमच्यासारखे मध्यभागी राहावं, असं प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.
स्वप्नील उमप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, अमरावती | 14 फेब्रुवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोदी की गॅरंटी म्हणत देशातील जनतेला अश्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण दुसरीकडे त्यांच्याच मित्र पक्षाच्या नेत्यांनी मोदी गॅरंटीवरून सवाल केला आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मोदी गॅरंटीवरून भाजपला सवाल केला आहे. एवढेच नव्हे तर दोनवेळा मुख्यमंत्री राहूनही भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल बच्चू कडू यांनी अशोक चव्हाण यांनाही सवाल केला आहे. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकार अपयशी ठरलं असून भिकारचोट योजना बंद करा, असा संतापही बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा सवाल केला. दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यावरून बच्चू कडू यांनी मोदींना सवाल केला आहे. आंदोलन चिघळू नये म्हणून सरकारने निर्णय घेतला पाहिजे. नाही तर आम्ही सुद्धा आंदोलनात सहभागी होऊ, असा इशाराच बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक गोष्टींची गॅरंटी घेत आहेत. मग हमीभावाची गॅरंटी का घेत नाहीत ? असा खोचक सवाल करत बच्चू कडू यांनी मोदी गॅरंटीची खिल्ली उडवली आहे.
केंद्र सरकार अपयशी
यावेळी बच्चू कडू यांनी केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीकाही केली आहे. हे सरकार पूर्ण फेल झालं आहे. मी जरी सरकारमध्ये असलो तरी सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठल्याही चांगल्या योजना दिल्या नाहीत. भिकारचोट योजना बंद करा आणि शेतकऱ्यांना हमीभाव द्या. शेतकऱ्यांच्या खिशात पैसे येत नाहीत. उलट त्यांचं व्याज कट होतं. सरकारने डाकेखोरी बंद केली पाहिजे, असा हल्लाच बच्चू कडू यांनी चढवला आहे. बच्चू कडू यांच्या या टीकेने एकच खळबळ उडाली आहे.
ते स्पष्ट झालं पाहिजे
यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपमधील प्रवेशावरही टीका केली. विकासाचं जाळ आहे, त्या जाळ्यात ते अडकले आहेत. विकासाच्या जाळ्यात अडकल्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत, असा चिमटा बच्चू कडू यांनी काढला. अशोकराव चव्हाण हे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे ते भाजपामध्ये का गेले? त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे, पण लोकांच्या मनात भ्रम आहे. तुम्ही दोन वेळा मुख्यमंत्री असताना भाजपमध्ये का गेले? ते स्पष्ट झालं पाहिजे, अस ते म्हणाले.
तर आम्हालाच विरोधकांची भूमिका पार पाडावी लागेल
शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या जोरदार चर्चा आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोण कोणत्या पक्षात विलीन होईल हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. अशीच परिस्थिती राहिली तर प्रहारलाच विरोधकांची भूमिका पार पाडावी लागेल, असंही त्यांनी सांगितलं.