मुंबई : शिवसेनेने संभाजी ब्रिगेड सोबत आघाडी केली आहे. यावरुन शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नव्या आघाडीच्या शुभेच्छा पण अजुन MIM बाकी असल्याचा टोला गोगावले यांनी लगावला आहे. बुडत्याला काडीचा आधार असल्याचे उदाहरण गोगवले यांनी दिले आहे. पावसाळी अधिवेशान झालेल्या 50 खोके एकदम OK या घोषणाबाजीवरही गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
इंदापूर विभाग शिवसेना शिंदे गटाचा भव्य मेळावा आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे पार पडला. या मेळाव्यात बोलताना त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. खोके, बोके काय असतात आणि आम्हाला गद्दार म्हणून हिणवणाऱ्यांना आम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमचा हिसका अधिवेशन सुरु होण्या अगोदर दाखवला आहे.आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असून त्यांची शिवसेना, त्यांचे विचार, त्यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जात आहोत, आमचा नाद कुणी करायचं नाय असा इशाराच आमदार भरत गोगावले यांनी दिला आहे.
यावेळी चौफेर टोलेबाजी करताना आमदार गोगावले यांनी तटकरे परिवारावर देखील निशाणा साधला. जी माणसे सुनील तटकरे, आदिती तटकरे, अनिकेत तटकरे यांचा तिरस्कार करायची ती माणसे आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. आम्ही कोणावर टीका करणार नाही. पण, आमच्या बाबतीत कोणी काही बोलल्यास मग मात्र त्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांनी आमच्या नादाला लागू नये. आमची ताकद ही समोर बसलेली जनता आहे. येणाऱ्या काळात विरोधकांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा गोगवले यांनी दिला.
आमचे सरकार आल्यावर जनतेच्या हिताच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेत आहेत. 75 वर्ष वरील नागरिकांना मोफत एसटी प्रवास मग ती लालपरी असो अथवा शिवशाही असो त्यातून मोफत प्रवास. तसेच पोलिसांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीनेही आमचे सकारात्मक प्रयत्न सुरु आहेत.
काहीजण मंत्री झाल्यावर हवेत जातात. पण आम्ही ती मंडळी नाही. काहींनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत.परंतु तुम्ही काय चमत्कार होतोय ते बघा मी शूरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पुण्यभूमीतील मावळा आहे. हा रायगडचा मावळा कधीही काहीही करू शकतो. सत्तेसाठी मी लाचार नाही. निजामपूरच्या सरपंचानी आमच्या विरोधात बोलू नये. त्यांनाही आम्ही लवकरच आमचा हिसका दाखवू. ज्याप्रमाणे मी महाड विधानसभा मतदार संघात विकासकामे केली त्याप्रमाणे येणाऱ्या काळात श्रीवर्धन विधानसभा मतदार संघासह रायगड जिल्ह्यात विकासकामे करणार आहे. इंदापूर विभागातील विविध विकासकामे आपण नजीकच्याच काळात मार्गी लावू. दोन्ही सरकारचा निधी विविध विकासकामांसाठी आपण आणू. घर टू घर नळ कनेक्शन हा शासनाचा धोरण असून जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या नळपाणी पुरवठा योजना आपण महाड विधानसभा मतदार संघात केलेल्या आहेत. मुख्यमंत्री नावाला शिवसेनेचा पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसने
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांपूर्वी सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री नावाला शिवसेनेचा पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेला चार नंबरवर खाली आणले. हे आम्ही उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास अनेक वेळा आणून देखील त्यांनी त्याकडे तेवढे लक्ष दिले नाही.
पवार साहेबांनी अशी काही जादूची कांडी फिरवली होती की त्याकडे उद्धव ठाकरे आमच्या बोलण्याकडे लक्षच देत नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्यावर आम्ही सारी मंडळींनी त्यांना साथ दिली. 40 हून अधिक आमदार तसेच मंत्री व जवळपास बारा खासदार आमच्यासोबत येतात. याचे कारण काय ? आम्ही त्यांना सांगत होतो आपण भाजप बरोबर जाऊ पण राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला सोडा याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिलेच नाही.
आम्ही बाहेर पडल्यावर अनेकवेळा आम्हाला परत या म्हणून त्यांचे फोन आले.आता त्यांनी पहिले हे आता आपल्याबरोबर येणार नाहीत म्हणून ते आमच्यावर टीका करीत आहेत.