Aaditya Thackeray : कितीही आले आणि गेले तरी फरक पडत नाही; किशोर पाटलांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आज जळगावात आले आहेत. त्यांच्या शिवसंवाद यात्रेचा हा चौथा टप्पा आहे. आदित्य ठाकरे थेट बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात येत आहेत. त्यामुळे जळगावातील राजकारण तापलं आहे. आदित्य यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी पोस्टर लावले होते.
जळगाव: शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांची शिवसंवाद (shiv samvad) यात्रा आज जळगावात येत आहेत. त्यापूर्वीच जळगावातील राजकारण तापलं आहे. जळगावात आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे पोस्टर फाडण्यात आल्याने शिवसैनिक तापले आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचले आहे. आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा म्हणजे उशिरा सूचलेलं शहाणपण आहे. शिवसेनेने (shivsena) महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे. असे कितीही आले आणि गेले तरी मला काही फरक पडत नाही, असा हल्लाबोल किशोर पाटील यांनी केला आहे. किशोर पाटील यांच्या या हल्ल्यानंतर जळगावातील वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. तर आदित्य ठाकरे आज किशोर पाटील आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हल्ल्याला कसे प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
किशोर पाटील यांनी मीडियाशी संवाद साधून आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. मी या मतदारसंघातून हॅट्रिक करणार आहे. हे मी तुम्हाला डंके की चोटपर सांगतो. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो कार्यालयातून काढायला उशीर झाला. मात्र फोटो लवकरच निघतील. माझ्या हृदयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो कोरलेला आहे. तो कुणी काढू शकत नाही, असं किशोर पाटील म्हणाले.
तुमची महाराष्ट्राशी गद्दारी नव्हती का?
माझी बहीण शिवसेनेत गेली याचं वाईट वाटलं. पण माझी बहीण ग्रामपंचायतला सुद्धा निवडून आलेली नाही. तरीही ती जे स्वप्न पाहतेय ते यशस्वी होणार नाही. भावनिक बोलून मतदार संघात विकासाचा प्रकाश टाकता येत नाही. आम्हाला गद्दार म्हणतात मग शिवसेनेने युतीतून बाहेर पडून काँग्रेस सोबत आघाडी केली. तुमचं हे कृत्य महाराष्ट्राशी गद्दारी नव्हती काय? असा सवाल त्यांनी केला आहे.
त्यांच्या पक्षाचं काम करू द्या
दरम्यान, आदित्य ठाकरे आज जळगावात आले आहेत. त्यांच्या शिवसंवाद यात्रेचा हा चौथा टप्पा आहे. आदित्य ठाकरे थेट बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात येत आहेत. त्यामुळे जळगावातील राजकारण तापलं आहे. आदित्य यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी पोस्टर लावले होते. मात्र, अज्ञात इसमाने ही पोस्टर्स फाडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मतदारसंघातील वातावरण तापू नये म्हणून गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. ज्यांना यायचं त्यांना येऊ द्या. त्यांना रोखू नका. त्यांना त्यांच्या पक्षाचं काम करू द्या, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. तर किशोर पाटील यांनी मात्र, आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.