राष्ट्रवादीला धक्का, आमदार पांडुरंग बरोरा शिवसेनेत!
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे वाडा-शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे वाडा-शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आमदार पांडुरंग बरोरा उद्या म्हणजेच 10 जुलै रोजी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आमदार पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादीची आमदारकी सोडण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दाखल झाले. शिवसेना विधानसभा गटनेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे आमदारपदाचा राजीनामा सादर केला.
पांडुरंग बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायर होत होते. यामध्ये ‘आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर राष्ट्रवादीच्या पांडुरंगाच्या हातात भगवी पताका’ असे म्हटलं होतं. पांडुरंग बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशाने शहापूर तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा झटका बसणार आहे.
बरोरा यांचे 40 वर्षांपासून राष्ट्रवादी शी आणि शरद पवार, अजित पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. मात्र उद्या ते आपल्या कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पांडुरंग बरोरा हे 2014 मध्ये मोदी लाटेतही राष्ट्रवादीकडून निवडून आलेले एकमेव आदिवासी आमदार आहेत.