Prashant Bamb : “मी काय बोलावं हे तुम्ही मला सांगू नका”, प्रश्न विचारणाऱ्या शिक्षकालाच प्रशांत बंब यांचा सवाल, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
भाजप आमदार प्रशांत बंब यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यात ते एका सरकारी शाळेतील शिक्षकाशी बोलताना दिसत आहेत.
मुंबई : भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यात ते एका सरकारी शाळेतील शिक्षकाशी बोलताना दिसत आहेत. हा शिक्षक आमदार बंब यांना सरकारी शाळेत कशी दुरावस्था आहे, कोणकोणत्या समस्या आहेत, हे सांगत आहे. त्यावर आमदार बंब त्यांना आरेरावीची भाषा वापरताना दिसत आहेत. “मी काय बोलवं हे तुम्ही मला सांगू नका”, असं ते या शिक्षकाला ठणकावून सांगत आहेत. या शिक्षकाने आमदारांसमोर आपल्या समस्या मांडल्या. त्यावर “शाळेतली दुरावस्था बघून तुम्हाला लाज वाटत नाही का?”, असा प्रतिसवाल बंब (Prashant Bamb Audio Clip) करताना दिसत आहेत. हा शिक्षकही बंब यांना तुम्हाला या सगळ्याची लाज वाटायला हवी असं म्हणत आहे. दरम्यान, या ऑडिओ क्लिपची टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाही.
बंब आणि शिक्षकातील संभाषण
आमदार बंब : ग्रामसेवक, कृषी सहाय्यकाशी मी बोललो आहे. काल विधिमंडळात शालेय शिक्षणावर चर्चा झाली. त्यावर काल मी बोललो. मी काय बोलवं हे तुम्ही मला सांगू नका. माझी गोष्ट बरोबर आहे की चुक हे तुम्ही मला सांगू नका.
शिक्षक : तुम्ही कधी कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा पाहिल्या आहेत का? तिथं शौचालयं नाहीत सर. शाळेच्या छताचे पत्रे उडालेले आहेत. तुमच्या भागातल्या शाळेकडे तुमचं लक्ष आहे का? तुम्ही सरकारी शाळांबाबत एवढं बोलता. पण तुमच्या भागातील शाळांमध्ये शौचालयं नाहीत. मुलं उघड्यावर शौचाला बसतात.
आमदार बंब : मग तुम्हा शिक्षकांना काही लाज वाटत नाही का?
शिक्षक : तुम्ही आमदार आहात. तुम्हाला लाज वाटायला हवी, एक आमदार म्हणून
आमदार बंब : त्याच्यासाठीच आम्ही सभागृहात प्रश्न मांडतो ना…
शिक्षक : तुमच्या भागातले रस्ते कसे आहेत? रस्ते आहेत का? गटारी आहेत का?
आमदार बंब : आहो तुम्ही दारू प्यायला आहात का?
शिक्षक : इथले शिक्षक किती अडचणीमध्ये मुलांना शिकवत आहेत, तुम्हाला माहिती आहे का?
आमदार बंब : अरे काय खोटं बोलता… अरे बाबा तुम्ही जर तसे असता ना, तर स्वत:ची मुलं स्वत:च्या शाळेत शिकवली असती.
शिक्षक : सर मला शिकवू नका, मी माझी मुलगी जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकवली आहे.
आमदार बंब : आहो तुमच्या एकट्याची आहे म्हणून काय झालं. मुर्खासारखं बोलू नका, ओव्हरऑल सांगा.
शिक्षक : बरं तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकत आहेत? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या… तुम्ही एक आमदार आहात. तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकत आहेत?
आमदार बंब : आरे तुमच्यामुळंच ना… तुम्ही बरोबर शिकवत नाहीत ना…
शिक्षक : आम्ही बरोबर शिकवतोय. शासन आम्हाला काम करू देत नाही.
आमदार बंब : काय खोटं बोलता… निर्लज्जासारखं… तुमच्यासारख्या निर्लज्जांमुळे तुमची निर्लज्जता आहे की तुम्ही फोनवर असं बोलू शकता.
शिक्षक : तुम्ही लोकप्रतिनिधी आम्हाला काम करु देत नाही.
आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकामधील हा संवाद सध्या व्हायरल होतोय. ही ऑडिओ क्लिप महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेच विषय बनली आहे.