अमरावतीः सध्या राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठ्या घडामोडी घडत आहेत. आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. त्यामुळ सत्ताधारी आणि विरोधकांनी आपापली तोफ डागण्याचे काम सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्यावर टीका केली गेल्यामुळे राणा आणि मिटकरी वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. अमोल मिटकरी यांनी रवी राणा यांच्यावर टीका केल्यानंतर आता मिटकरी आणि राणा वाद चिघळला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर रवी राणा यांनी पलटवार करत अमोल मिटकरी हे कीर्तनकार आहेत. कीर्तन केल्यासारखे त्यांनी आरोप प्रत्यारोप करू नये असा टोला त्यांना त्यांनी लगावला आहे.
रवी राणा यांनी अमोल मिटकरी यांच्यावर टीका करताना महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी केलेल्या कारवाईचीही त्यांनी त्यांना आठवण करून दिली आहे.
रवी राणा यांनी अमोल मिटकरी यांच्यावर टीका करताना महाविकास आघाडीच्या 33 महिन्याच्या काळामध्ये नाफेडचे सर्व सेंटर बंद पडले होते असा पलटवार करत त्यांना मविआच्या कामंही त्यांना दाखवून दिले.
अमोल मिटकरी आता माझ्यावर टीका करत आहे मात्र त्यांचे सरकार असताना त्यांनी शेतकऱ्यांची आणि राज्यातील जनतेची कोणती काम त्यांनी केली होती असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 33 महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालं, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बांध वाहून गेले तेव्हा तुम्ही झोपा काढल्या का असा तिखट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात संकटावर संकट येत होती. येथील जनता अनेक समस्यांनी त्रस्त होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहा महिने घराबाहेर पडले नव्हते. त्यावेळी तुम्ही शांत का बसला होता असंही त्यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या काळात रवी आणि नवनीत राणा यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला होता. त्यावेळची त्यांना आठवण करून देत ते म्हणाले की, जेव्हा आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले होते.
तेव्हा शेतकऱ्यांसकट आम्हाला तुम्ही जेलमध्ये टाकलं होतं. त्यावेळी तुम्ही 33 महिन्याच्या कार्यकाळात काय केलं आणि काय काय दिवे लावले याचा चिंतन तुम्ही एकदा करावे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.