Sanjay Shirsat : मंत्रिपदावरून बंडखोर आमदारांमध्ये खदखद, शिरसाट उघड बोलले; ‘त्या’ ट्विटवरही केला खुलासा
Sanjay Shirsat : मंत्रीपदासाठी मी असल्या कुठल्याही आयडिया लावत नाही. मी माझी नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलून दाखवली आहे. मला कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा आहे. शिंदे साहेब देतील अशी अपेक्षा आहे, असं ते म्हणाले.
औरंगाबाद: शिवसेनेविरोधात (shivsena) बंड करून आमदारांनी एकनाथ शिंदे यांना आपला नेता जाहीर केलं. त्यानंतर या गटाने शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपशी युती करून राज्यात सत्ता स्थापन केली. आम्हाला मंत्रिपदाची लालसा नाही. आम्ही मंत्रीपदासाठी बंड केलं नाही. महाविकास आघाडीतही आम्हाला मंत्रीपदे होती. पण ती नैसर्गिक आघाडी नव्हती. भाजपसोबत (bjp) आमची नैसर्गिक युती होती. म्हणून आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊनच आम्ही पुढे जात आहोत, असं शिंदे गटाचे बंडखोर सांगत आहेत. परंतु, मंत्रिमंडळाचा विस्तार होताच शिंदे गटातील खदखद बाहेर येऊ लागली आहे. मंत्रिपदासाठीची ही खदखद आहे. आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या माध्यमातून ही खदखद समोर आली आहे. मला कॅबिनेट मंत्रीपद हवं आहे. त्याबाबतची अपेक्षा मी बोलून दाखवली आहे, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. त्यातच शिरसाट यांचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरील ट्विट समोर आल्यानंतर शिंदे गटात मंत्रिपदावरून खदखद सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे.
उद्धव ठाकरे हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत, असं ट्विट काल संजय शिरसाट यांनी केलं होतं. त्यामुळे संजय शिरसाट हे शिंदे गटात नाराज असून दबाव तंत्राचा वापर करत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या ट्विटची जोरदार चर्चा झाल्यानंतर आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी शिरसाट यांच्याशी संपर्क केल्यानंतर शिरसाट यांनी हे ट्विट डिलीट केलं आहे. त्यावरून त्यांनी खुलासाही केला आहे. उद्धव ठाकरे हे आमचे कुटुंबप्रमुख होते आणि आहे. माझ्या मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम झाला. मागची पोस्ट कशी फॉरवर्ड झाली माहीत नाही. त्या पोस्टचं समर्थन करणार नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे. हे दबाव तंत्र नाही. मी काही तरी करेल हे दाखवणं हे स्वभावात नाही. मी परत माघारी जातोय असा त्याचा अर्थ नाही, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं.
मला कॅबिनेटची अपेक्षा आहे
विस्तारापूर्वी नंदनवनला गेले होतो. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मंत्रिपदावर चर्चा झाली होती. शेवटी यादी फायनल झाली. त्यावेळी मी त्यांच्याशी बोललो. शिंदे यांनी सर्वांशी चर्चा केली आणि यादी तयार केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात हे स्टेटमेंट नाही, असं सांगतानाच मंत्रीपदासाठी मी असल्या कुठल्याही आयडिया लावत नाही. मी माझी नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलून दाखवली आहे. मला कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा आहे. शिंदे साहेब देतील अशी अपेक्षा आहे, असं ते म्हणाले.
मी होतो कोण? साधा कामगार, रिक्षाचालक
यावेळी संजय शिरसाट यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ते घरातील जुना फोटो दाखवत होते. शिवसेना आणि बाळासाहेबांसोबत माझी अटॅचमेंट आहे. बाळासाहेबांबद्दल कुणीही काही बोललं तरी आम्ही काहीही करू शकतो. बाळासाहेब 1986 साली औरंगाबादला आले तेव्हा त्यांना 10 रुपयांचा हार घालायची आमची ऐपत नव्हती. बाळासाहेब झोपले त्या हॉटेलला आम्ही रात्रभर पहारा द्यायचो. मी होतो कोण? रिक्षाचालक. साधा कामगार. पण बाळासाहेबांमुळे मोठा झालो. त्यामुळे मी आजही शिवसेनेत आहे, असं ते म्हणाले.