तुमचं सरकार आलं नाही तर लोकांना जोडे मारायला सांगा; संजय शिरसाट यांनी राऊतांना डिवचलं
कृषीमंत्री धनंजय मुंडे परदेशात गेले असले तरी यंत्रणा बंद पडलेली नाही. जिथे बियाणे मिळत नाही, बोगस बियाणे मिळत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही संजय शिरसाट यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
महायुतीतील मंत्री छगन भुजबळ हे नाराज असतील त्यांनी बोलून दाखविली पाहीजे. तुमची भूमिका मांडत नाही तोपर्यंत त्यांना गांभीर्याने घेणार कसे? संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य त्य़ांनी करू नये. भुजबळ नाराज असतील तर महायुती त्यांच्याबाबत निर्णय घेईल असे महायुतीचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. मराठवाड्यातील दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेतली. आता काही लोक अचानक झोपेतून जागे झाल्यासारखे दौरे करीत आहेत. पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्र्यांना फोन लावणे. जणू यांच्या फोनची मुख्यमंत्री वाट बघत असतील असं यांना वाटतंय. कार्यक्रमात असल्याने मुख्यमंत्र्यांनी व्यस्थतेमुळे कॉल घेतला नाही असेही शिरसाट यांनी सांगितले .
या पूर्वीचं सरकार अजगरासारखे झोपी गेलेलं सरकार होतं. आता सरकार शेतकऱ्यांबद्दल सकारात्मक असताना. त्याला मदत केली पाहजे. मात्र विरोधकांची नौटंकी चालणार नाही…नंतर हे कुठे जातील यांना माहित नाही अशीही टीका शिरसाट यांनी केली आहे. यांचे नेते परदेश दौरा करत आहेत. यांना जायला मिळालं नाही म्हणून हे असं बोलत आहेत. 4 जूननंतर सरकार बदलणार म्हणतायंत मग 5 जूनपासून चौकशी कारवाया सुरू करा. सरकार येणार नसेल तर लोकांना जोडे मारायला सांगा अशी टीका संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर केली. 4 जूननंतर मजा येणार आहे, आघाडीतील पक्ष एकमेकांविरोधात जाणार आहे. आलेल्या सरकारवर बोलण्यापेक्षा यांची आपसात मारामारी होईल असेही शिरसाट यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांनी उपोषण करू नये
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसणार अशी घोषणा केली. मराठा आरक्षणाबद्दल सरकार सकारात्मक असतानाही ज्या लोकांनी आजपर्यंत मराठा समाजाला त्रास दिला ते आता टीका करीत आहेत. या सरकारने साडेतीन लाख कुणबी नोंदी मिळविल्या आहेत. नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण दिले आहे असे संजय शिरसाट यांनी सांगितले. सग्या सोयऱ्यांच्या निर्णयाबाबत सरकार निवडणुकीनंतर निर्णय घेईल. सरकार मराठ्यांच्या आरक्षणाबाबत सकारात्मक असताना मनोज जरांगे यांनी उपोषण करू नये असेही आवाहन शिरसाट यांनी केले आहे. मनोज जरांगे निवडणूक लढविणार असतील तर त्यांनी लढवावी, कुणी निवडणूक लढवावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या निर्णयाबाबत शंका उपस्थित करणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जयंत पाटील अस्थिर आहेत…
जयराम रमेश यांनी जे होणार नाही त्यावर वल्गना करणे याला काही अर्थ नाही. आता त्यांनी फक्त स्वप्न पहावे लोकांनी त्यांची मानसिकता ठरवली आहे. महायुतीच्या सरकारचा शपथविधी होईल यानंतर यांचे चेहेर उतरतील असेही शिरसाट यांनी सांगितले. तटकरे हे भाजपात जाणार नाहीत. उलट त्यांनी फिरवून सांगितले आहे की शरद पवार गटाचे आमदार अजित पवार गटात किंवा महायुतीमध्ये येतील. याचा लेखाजोखा 4 जूननंतर मिळेलच असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील अस्थिर आहेत. त्यांना रोहित पवार यांच्या हाताखाली काम करावं लागतं आहे. जयंत पाटील पक्ष सोडतील असेही शिरसाट यांनी सांगितले.
वडेट्टीवार महायुतीत सहभागी होणार
कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार भाजपात येणार आहेत असे राणे सांगत आहेत. आम्ही म्हणतो शिवसेनेत येणार आहेत. वडेट्टीवार भाजपामध्ये येणार की शिवसेनेत येणार हे आम्ही ठरवू, मात्र वडेट्टीवार महायुतीत सहभागी होणार हे निश्चित असल्याचे शिरसाट यांनी यावेळी सांगितले. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यात स्पर्धा सुरू आहे. निकाल आल्यानंतर हे दोघंही रडत बसतील. पटोले इतर पक्षांत कधी जातील आणि आपली बढती कधी होईल यासाठी विजय वडेट्टीवा यांचे प्रयत्न सुरू असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले.