वेदांता प्रकल्प अजित पवार, आदित्य ठाकरेंमुळे गुजरातला गेला?; शिंदे गटाचा आमदार करणार मोठा गौप्यस्फोट
शिंदेसाठी मी शिवसेना सोडलीये. मला पक्ष जी जबाबदारी देईल ती मान्य आहे. मी खूष आहे. नाराज अजिबात नाही. आपल्याला जबाबदारी मिळावी असं प्रत्येक आमदाराला वाटत असतं. मलाही जबाबदारी मिळेल अशी अपेक्षा आहे.
मुंबई: वेदांता प्रकल्प (vedanta project) गुजरातला गेल्याने त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी या प्रकल्पावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करतानाच केंद्रातील भाजप सरकारवरही जोरदार हल्लाबोल चढवला आहे. या प्रकल्पावरून विरोधकांचा चौफेर हल्ला होत असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी विरोधकांवर पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. वेदांता प्रकल्प कुणामुळे गेला आणि का गेला? याचा लवकरच खुलासा करणार असल्याचा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे. शिरसाट यांचा रोख विरोधकांवर असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वेदांताचा प्रकल्प खराब पायाच्या मागच्या सरकारमुळे गेला. हा प्रकल्प उद्धव ठाकरेंमुळे गेला. आम्हाला तर येऊन दोन महिनेच झालेत. हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी आम्ही अजूनही प्रयत्न करत आहोत, असं सांगतानाच या सर्व प्रकाराला आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई जबाबदार आहेत. हा प्रकल्प कुणामुळे गेला त्यांची नावे लवकरच जाहीर करणार आहे. अडीच वर्षात या प्रकल्पाला घालवण्यात कुणाचा हात होता ते देखील सांगू, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे कान टवकारले आहेत.
शिंदे गटाने नेते आणि उपनेतेपदाची यादी जाहीर केली आहे. त्यात संजय शिरसाट यांचं नाव नाहीये. शिरसाट मंत्रीपद न मिळाल्याने नाराज होते. त्यातच आता त्यांना उपनेतेपदावरून डावलण्यात आल्याने शिरसाट यांचा पक्षातून पत्ता कट केला जातोय का? किंवा शिरसाट हे नाराज आहेत का? अशी चर्चा रंगली होती. त्यावर शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे. मी नाराज नाही. माझ्याबद्दल जर कुणी अशी अफवा पसरवत असेल तर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
मला काहीही मिळालं नाही तरी मी शिंदे गटातच राहणार आहे. मी एक सच्चा कार्यकर्ता आहे. मी काम करतच राहणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिंदेसाठी मी शिवसेना सोडलीये. मला पक्ष जी जबाबदारी देईल ती मान्य आहे. मी खूष आहे. नाराज अजिबात नाही. आपल्याला जबाबदारी मिळावी असं प्रत्येक आमदाराला वाटत असतं. मलाही जबाबदारी मिळेल अशी अपेक्षा आहे. पक्षाला जे नेते योग्य वाटले त्यांना पदे मिळाली. ते चांगलं काम करतील, असंही त्यांनी सांगितलं.