अधिवेशनासाठी सत्यजित तांबे यांचा लोकल प्रवास; म्हणाले, मुंबईकर प्रचंड सहनशील!

| Updated on: Jul 25, 2023 | 3:12 PM

MLA Satyajeet Tambe Travel by Mumbai Local Train : सत्यजित तांबे 3-4 तास ट्रॅफिकमध्ये फसले, पण अखेर लोकलने अधिवेशन गाठलं; म्हणाले, मुंबईकरांविषयीचा आदर वाढला...

अधिवेशनासाठी सत्यजित तांबे यांचा लोकल प्रवास; म्हणाले, मुंबईकर प्रचंड सहनशील!
Follow us on

मुंबई | 25 जुलै 2023 : सध्या राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईतही जोरदार पाऊस सुरू आहे. अशातच मुंबईकरांना ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनाही मुंबईतील ट्रॅफिकचा सामना करावा लागला. ते तीन ते चार तास ट्रॅफिकमध्ये अडकले होते. मात्र नंतर मुंबई लोकलने प्रवास करत सत्यजीत तांबे अधिवेशनासाठी पोहोचले.

नेमकं काय झालं?

सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरु आहे. अशात आमदार सत्यजीत तांबे अधिवेशनाला येण्यासाठी निघाले. संगमनेरहून मुंबईच्या दिशेने सत्यजीत तांबे येत होते. नाशिक-मुंबई हायवेवर भिवंडीजवळ तीन ते चार तास ते ट्रफिकमध्ये अडकले. तेव्हा त्यांनी यातून मार्ग काढून अधिवेशनाला वेळेत जाण्याचं सत्यजीत यांनी ठरवलं.

भिवंडी बायपासवरून कल्याणपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना 30 मिनिटांचं अंतर कापायला त्यांना तीन तास लागले. शेवटी त्यांनी लोकलने अधिवेशनाला जाण्याचं ठरवलं. अखेर कल्याणवरून त्यांना एसी लोकल पकडली आणि सीएसएमटीला ते पोहोचले.

सत्यजीत तांबे यांनी या प्रवासादरम्यान फोटो काढला आणि तो ट्विटरला शेअर केला. #शहर_विकास असं म्हणत सत्यजीत तांबे यांनी आपल्या लोकल प्रवासाचा अनुभव शेअर केला. त्यांनी मुंबईकरांच्या स्पिरीटबद्दल आदर व्यक्त केला. मुंबईकर प्रचंड सहनशील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आमदार सत्यजीत तांबे यांचं ट्विट जसंच्या तसं…

दुपारपासून संगमनेरवरुन मुंबईला अधिवेशनास उपस्थित रहाण्यासाठी निघालो. नाशिक-मुंबई हायवे वर भिवंडी येथे ३-४ तास ट्रॅफिकमध्ये अडकलो, शेवटी एका मित्राने सल्ला दिला की, कल्याणवरुन लोकल ट्रेनने लवकर पोहोचशील, मग काय भिवंडी बायपासवरुन कल्याणच्या दिशेने प्रवास सुरु झाला, तेथेही ३० मिनिटांच्या प्रवासाला ३ तास लागले व अखेर आता ट्रेनने मुंबईकडे निघालोय.

खरंतर आज माझा मुंबई महानगर प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या पालघर पासून पनवेल पर्यंत तर कल्याण-डोंबिवली पासून मुंबई पर्यंतच्या जनतेविषयी प्रचंड आदर वाढलाय, किती सहनशील जनता आहे !

मुंबईच्या अवतीभवती पायाभूत सुविधांचा पुरा बोजवारा उडालाय, माणसाची जीवनशैलीची ऐंशी की तैशी झालीय, पण आपली सहनशिलता अजूनही संपायचे नाव घेत नाही. #शहर_विकास